पालघर : संपूर्ण महाराष्ट्र राज्य पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी राज्य शासन जलयुक्त शिवार अभियान हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवित असून पालघर जिल्ह्यात या अभियानांतर्गत ५१ गावांमध्ये कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात प्रत्येक वर्षी निर्माण होणारी पाणीटंचाई दूर होऊन मुबलक पाणीसाठा निर्माण होईल, असा विश्वास पालकमंत्री विष्णू सवरा यांनी व्यक्त केला.जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मौजे खरशेत येथील वनबंधाऱ्यातील पाणीसाठ्याचे जलपूजन शनिवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जि.प. अध्यक्षा सुरेखा थेतले, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. प्रकाश पवार इ. मान्यवर उपस्थित होते.या अभियानांतर्गत जिल्ह्यातील पालघर- ४, वसई- ४, डहाणू- ४, तलासरी- ४, वाडा- ५, विक्रमगड- ७, जव्हार- ११ तर मोखाडा- ११ गावांची निवड करण्यात आली असूनपावसाचे वाहून जाणारे पाणी शिवारातच बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधारे यांच्या माध्यमातून अडविण्यात आले आहे. त्यामुळे भूगर्भाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात विहिरी व बोअरवेलना पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. जिल्ह्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगून नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन ही योजना यशस्वी करावी, असे आवाहन केले. (वार्ताहर)
यंदा पालघरच्या ग्रामीण भागात मुबलक पाणी
By admin | Updated: August 18, 2015 23:10 IST