ठाणे : ‘घेई छंद मकरंद’, ‘वद जाऊ कुणाला’,‘हे सुरांनो चंद्र व्हा’, ‘सोहम हर डमरू बाजे’, ‘अमृताहुनी गोड’ अशा एकाहून एक लोकप्रिय नाट्यगीतांनी श्रोत्यांचे कान तृप्त झाले. ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांच्या सांगीतिक कारकिर्दीची ५० वर्षे यंदा पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांची कन्या, शिष्या वेदश्री खाडिलकर-ओक यांच्या संकल्पनेतून ‘सूरदासी आशा’ हा कार्यक्रम सहयोग मंदिरात झाला. तेराव्या वर्षांपासून जाहीर कार्यक्रम करणाऱ्या आशाताई यांना पं. अभिषेकी, पं. वसंतराव देशपांडे, पंडिता माणिक वर्मा, पं. यशवंत जोशी, पं. शंकर अभ्यंकर, पं. पद्मावती शाळीग्राम अशा दिग्गज गुरूंचा सहवास लाभला. याचा उल्लेख करत या गुरूंच्या विशिष्ट शैलीतून नटलेल्या आणि खाडिलकर यांनी तडफदार गायिकेने लोकप्रिय केलेल्या रचना वेदश्री यांनी या कार्यक्रमात सादर केल्या. याशिवाय, खाडिलकर यांनी रचलेल्या बंदिशी, भावगीत, गझल, ठुमरी असे विविध प्रकार या कार्यक्रमात वेदश्री यांनी सादर केले. ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘ने मजसी ने’ हे गीत त्यांचा पुत्र ओमकार यांनी सादर केले. कार्यक्रमाची सांगता करताना रसिकांच्या आग्रहाखातर खाडिलकर यांनी ‘अगा वैकुंठीचा राया’ ही भैरवी सादर केली. (प्रतिनिधी)
नाट्यगीतांनी रसिकांचे कान तृप्त
By admin | Updated: January 25, 2017 04:56 IST