ठाणे : शहरातील पार्किंग समस्या सोडविण्यासाठी ठाणे महापालिकेने आता विविध पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात येणाऱ्या प्रेक्षकांसाठी पार्किंग प्लाझा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. गावदेवी मंडईत सुमारे ३०० दुचाकी आणि घाणेकर नाट्यगृहात दुचाकी ५७५२ आणि चारचाकी ३७२१ वाहनांची पार्किंग करता येणार आहे.महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यासाठी आरक्षित भूखंड आणि मोकळ्या भूखंडांवर पार्किंगची व्यवस्था सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार थेट गावदेवी भाजी मंडईत दुचाकी वाहनांसाठी ही व्यवस्था उपलब्ध करुन दिली असून या संदर्भातील निविदा काढण्यात येत आहेत. पहिल्या दोन तासांसाठी १० रुपये आणि त्यापुढील चार तासांपर्यंत अतिरिक्त पाच रुपये आणि चार तासापुढील प्रत्येक तासाला अतिरिक्त ५ रुपये आकारले जाणार आहेत. डॉ. घाणेकर नाट्यगृह परिसरातदेखील पार्किंग प्लाझा असेल. महिनाकाठी चारचाकी वाहनांसाठी ५०० रुपये, तीन चाकीसाठी ४०० आणि दुचाकीसाठी ३०० रुपये दर आकारण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात पार्किंग प्लाझा
By admin | Updated: November 16, 2016 04:21 IST