डोंबिवली : ब्राह्मण सभा, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, श्री समर्थ सेवा मंडळ आणि दासबोध मंडळे यांच्यातर्फे सोमवारी दासनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. त्यामुळे सारे वातावरण भक्तिमय झाले होते.श्री गणेश मंदिर संस्थानातील वक्रतुंड सभागृहात हा कार्यक्रमझाला. यंदाचे या उत्सवाचे २६ वे वर्ष आहे. दासबोध मंडळातर्फे वर्षातून दोन मोठे कार्यक्रम होतात. तसेच वर्षातून एका सामाजिक संस्थेला काही रक्कम देणगी स्वरूपात दिली जाते. सकाळी ६ वाजता काकड आरती व प्रात:स्मरणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी अलका मुतालिक, सुधीर बर्डे, अच्युत कऱ्हाडकर, श्रीकृष्ण चिंचणकर, अरविंद हस्तेकर, उषा कळमकर, बाळ राजोपाध्ये, अविनाश कुलकर्णी, पद्मजा कुलकर्णी, अनुराधा मोहिदेकर, साधना जोशी आदी उपस्थित होते.प्रात:स्मरण यामध्ये विनिता पुरोहित यांनी स्तोत्रांचे पठण केले. त्यांच्यापाठोपाठ उपस्थित भक्तांनी स्तोत्रे म्हटली. सामुदायिक रामनामजप, त्यानंतर सामुदायिक मनाचे श्लोक पठण करण्यात आले. मृदुला साठे यांनी समर्थरचित भजनसेवा सादर केली. त्यात त्यांनी मराठी, हिंदी रचना सादर केल्या. साठे यांनी स्वरचित अशी १२ गाणी सादर केली. या गीतांना त्यांनीच संगीत दिले आहे. यामध्ये त्यांनी ‘एक तो गुरू दुसरा सद्गुरू’, दासबोधातील गणेशस्तवनातील पहिल्या ओव्यातील ‘ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फलदायक’ आणि रामाची भूपाळी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर, त्यांनी हिंदीतील ‘जीते देखों वहॉं राम राम, राम’ हे भजन सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. ह.भ.प. अर्चना जोशी यांनी कीर्तन सादर केले. पूर्वरंगात त्यांनी अभंग आणि उत्तररंगात समर्थांना गुरू दत्तात्रेयांनी दिलेले दर्शन प्रेक्षकांसमोर सादर केले. त्यांनी तुकाराम महाराजांचा ‘भक्त तेची जाण जे देही उदास’ हा अभंग सादर केला. या अभंगातून त्यांनी स्वत:च्या देहावर प्रेम नाही, तोच खरा भक्त, असे सांगितले. ‘दासबोधातील विवेक’ या विषयावर प्रकट चिंतन करण्यात आले. दासबोधात ‘विवेक’ हा शब्द ३५६ वेळा वापरला गेला आहे. त्यावर चिंतन झाले. प्रवचनकार ह.भ.प. माधुरी जोशी (बुलडाणा) यांनी ‘समर्थांचे आत्मनिवेदन भक्ती’ या विषयावर प्रवचन सादर केले. (प्रतिनिधी)
डोंबिवलीत दासनवमी उत्सव उत्साहात
By admin | Updated: February 21, 2017 05:23 IST