प्रशांत माने / कल्याणशहरातील पोलीस नियंत्रण कक्ष आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यापाठोपाठ डोंबिवली शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील टिळकनगर आणि विष्णूनगर पोलीस ठाण्यांचे १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर स्थलांतर होणार आहे. टिळकनगर पोलीस ठाणे पूर्वेतील पाथर्ली, तर विष्णूनगर पोलीस ठाणे हे पश्चिमेतील आनंदनगर भागात हलवण्यात येणार आहे. या दोन्ही ठाण्यांची हद्द पाहता ती आता मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित होणार असल्याने नागरिकांना सोयीस्कर ठरणार आहेत. सध्या टिळकनगर पोलीस ठाणे हे पूर्वेला रेल्वे स्थानकानजीक असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याच्या पाठीमागील पोलीस वसाहतीत आहे. तेथील इमारतींमधील काही खोल्यांचे रूपांतर या पोलीस ठाण्यासाठी करण्यात आले होते. काही वर्षांपूर्वीच निर्माण झालेल्या या पोलीस ठाण्याची हद्द दत्तमंदिर चौकापासून ते कल्याण पत्रीपूल, कचोरेपर्यंत आहे. त्यामुळे कचोरेला एखादी घटना घडली, तर तेथे पोहोचण्यासाठी पोलिसांना विलंब लागायचा. परंतु, आता हे पोलीस ठाणे पाथर्ली भागात हलवण्यात येणार आहे. त्यामुळे ते सोयीस्कर ठरणार आहे. तळमजला अधिक दोन मजले अशा प्रशस्त जागेत हे पोलीस ठाणे असणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही जागा प्रारंभी एमटीएनएलला सुचवण्यात आली होती. परंतु, त्यांना जादा जागेची निकड असल्याने त्यांनी संबंधित जागा नाकारली. त्यावर, पोलीस विभागाने केडीएमसीला केलेल्या पत्रव्यवहारानंतर ही जागा त्यांना उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी धुमाळ यांनी दिली. या स्थलांतराला स्थानिकांकडून प्रारंभी विरोध झाला होता. परंतु, कालांतराने तो मावळला. पश्चिमेतील विष्णूनगर पोलीस ठाणेही सुसज्ज अशा जागेत हलवण्यात येणार आहे. जुने पोलीस ठाणे रेल्वे स्थानकासमोरील धोकादायक इमारतीत आहे. आता पश्चिमेतील आनंदवाडी परिसरातील हिमालय आशीष इमारतीत त्याचे स्थलांतर होणार आहे. हे कामही अंतिम टप्प्यात आहे. टिळकनगर पोलीस ठाण्याबरोबरच त्याचाही शुभारंभ १ मे रोजी महाराष्ट्रदिनी होणार आहे.दरम्यान, गं्रथालय आणि अभ्यासिकेसाठी असलेल्या आरक्षित जागेत विष्णूनगर पोलीस ठाणे थाटण्याचा मुद्दा मार्चमधील केडीएमसीच्या महासभेत चांगलाच गाजला होता. पोलीस ठाणे आरक्षित जागेत थाटण्यास नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी विरोध केला होता. म्हात्रे यांनी मांडलेल्या सभा तहकुबीवर बोलताना, सर्वपक्षीय नगरसेवकांनीही पोलीस ठाणे थाटण्यास विरोध केला होता. यासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी १४ मार्चला मुख्यालयात विशेष बैठक घेतली. या वेळी महापालिका आयुक्तांसह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. अखेर, या बैठकीत सामंजस्याने तोडगा निघाला आणि संबंधित जागा पोलीस ठाण्याला देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले गेले. विशेष म्हणजे, या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या कार्यालय शुभारंभासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले जाणार आहे.
डोंबिवलीतील पोलीस ठाण्यांचे होणार स्थलांतर
By admin | Updated: April 24, 2017 02:16 IST