कल्याण : डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टर आणि रुग्णांमध्ये वाढणारी दरी मिटवण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कल्याण शाखेतर्फे रविवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. कल्याण आयएमएच्या तब्बल १९० डॉक्टरांनी यामध्ये रक्तदान केले.स्प्रिंगटाइम क्लबमध्ये हे शिबिर झाले. डॉ. प्रदीप बलिगा यांनी १२५ व्यांदा रक्तदान केले. याशिवाय, समाजातील जागरूक नागरिक, प्रतिष्ठित उद्योजक, व्यावसायिक, अधिकारी आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते. कल्याण रनर्स ग्रुप, तळवलकर्स जिम आठची बॅच, जायंट्स ग्रुप आदी सामाजिक संस्थांच्या ४०८ लोकांनी डॉक्टरांच्या या समाजोपयोगी कार्यामध्ये सहभागी होत रक्तदान केल्याची माहिती कल्याण आयएमएचे सचिव डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली.पाटील म्हणाले की, २७ वर्षांपासून रक्तदानाचा उपक्रम राबवत आहोत. यामध्ये जमा होणारे रक्त कल्याण-डोंबिवली महापालिकेच्यारुकिमणीबाई रुग्णालयातील अर्पण रक्तपेढीला उपलब्ध करून दिले जाणार आहे.अर्पण ब्लड बँकेच्या ४५ सहकाऱ्यांच्या मदतीने हे शिबिर भरवण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष डॉ. प्रदीपकुमार सांगळे, प्रकल्पप्रमुख डॉ. ईशा पानसरे यांच्यासह कल्याण आयएमएच्या संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली.
डॉक्टर्स डे निमित्त १९० डॉक्टरांचे रक्तदान, रुग्णांमध्ये वाढणारी दरी मिटवण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:15 IST