- जान्हवी मोर्ये, डोंबिवलीआत्महत्येचा विचार मनात येणे, हा मानसिक विकृतीचा प्रकार आहे. नकारात्मक विचाराने प्रभावित झालेली व्यक्ती आत्महत्या करते. अशा व्यक्तींना त्यापासून रोखण्याकरिता मुंबई विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाच्या वतीने गणेशोत्सवात ‘गणपतीबाप्पा मोरया, आत्महत्येपासून प्रवृत्त व्हा’ हा जगजागृतीचा उपक्रम हाती घेतला आहे.जगात ४० सेंकदाला एकजण आणि वर्षाला एक लाख लोक आत्महत्या करतात. आत्महत्येची विविध कारणे मानसशास्त्रात नमूद केली आहेत. मात्र, नकारात्मक विचारातून व्यक्ती आत्महत्या करण्याकडे प्रवृत्त होते. तिला त्यापासून परावृत्त करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या हा विषय गाजत आहे. समाजातील ही वाढती प्रवृत्ती रोखण्यासाठी मानसशास्त्र विषय शिकणारे विद्यार्थी पुढे आले आहेत. विद्यापीठातील डॉ. उमेश भरते आणि नीळकंठ बनकर यांनी याविषयी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले आहे. १० सप्टेंबर रोजी ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस’ साजरा केला जातो. यंदाचा गणेशोत्सव हा ५ ते १५ सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे. १० सप्टेंबर ही तारीख यादरम्यान येते. गेली पाच वर्षे हे विद्यार्थी या दिनाचे औचित्य साधून जनजागृती करीत आहेत. लोकमान्य टिळकांनी जनजागृती व सामाजिक प्रबोधनासाठी घरातील गणपती रस्त्यावर आणला व त्याला सार्वजनिक स्वरूप दिले. त्याच उद्देशाला अनुसरून समाजप्रबोधन करण्यासाठी मानसशास्त्र विभागाने एक पाऊल पुढे टाकले आहे. मध्य, उत्तर, दक्षिण मुंबईसह ठाणे, रायगड या परिसरातील गणेशोत्सव मंडळांना आत्महत्या रोखण्याच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन या विद्यार्थ्यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्यातील काही मंडळे उपक्रमात सहभागी झाली आहेत. मंडळाच्या ठिकाणी जाऊन हे प्रबोधन केले जाणार आहे. या उपक्रमातील सक्रिय विद्यार्थिनी नमिता सारंग हिने सांगितले की, मंडळाच्या ठिकाणी जाऊन विद्यार्थी आत्महत्येची कारणे काय, आत्महत्येचा विचार मनात आल्यावर तो कसा रोखायचा, याचे मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी पोस्टर्स तयार करण्यात आलेली आहे. हेल्पलाइन सेवा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे १० सप्टेंबरला सर्व विद्यार्थी आत्महत्येविरोधात फ्लॅश मॉब काढणार आहेत. सकारात्मक जीवन जगण्याचा संदेश या विभागाचे विद्यार्थी देणार असून त्यांनी अनेक गणेश मंडळांना आवाहन केले आहे. त्याला काही मंडळांनी प्रतिसादही दिला आहे. काही गणेशोत्सव मंडळांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला असून तो वाढणार असल्याचा विश्वास विद्यार्थिवर्गाकडून व्यक्त केला जात आहे.
मना... आत्महत्येला नाही म्हणा!
By admin | Updated: September 2, 2016 03:45 IST