ठाणे : ‘रंग बरसे भीगे चुनरवाली रंग बरसे’ असे म्हणत सर्वत्र धुलिवंदन हा सण साजरा केला जाणार असताना होळीच्या पूर्वसंध्येला मात्र दिव्यांग मुलांनी या सणाचा आनंद लुटला. एकमेकांवर मनसोक्त नैसर्गिक रंग उधळून उत्साहात, जल्लोषात ठाण्यात त्यांनी रंगपंचमी साजरी केली. सोमवारी सर्वत्र धुळवड साजरी केली जाणार आहे. पर्यावरणाविषयी ठाण्यात जागरुकता झाल्याने बहुतांशी ठाणेकर गेल्या काही वर्षांपासून इकोफ्रेण्डली रंगांना पसंती देत आहेत. सर्वसामान्यांप्रमाणे दिव्यांगांमध्येही इकोफ्रेण्डली ही संकल्पना रुजावी, त्यांना पर्यावरणाचे महत्त्व कळावे म्हणून विविध संस्था असो वा शाळा त्यांच्यासाठी पर्यावरणस्नेही उपक्रम राबवित असतात. सर्वसामान्यांप्रमाणे ही मुले ही इकोफ्रेण्डली होळी साजरी करतात. दरवर्षी धुळवडला नैसर्गिक रंगांची उधळण करून ही मुले संस्थेत, शाळेत हा सण मोठ्या आनंदात साजरा करतात. सोमवारी धुळवड आल्याने शनिवारीच काही संस्थांमध्ये हा सण साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे जागृती पालक संस्थेत दिव्यांग मुले आणि त्यांचे पालक यांनी मिळून हा सण साजरा केला. एकमेकांना नैसर्गिक रंग लावून या सणाचा मनमुराद आनंद लुटला. तत्पुर्वी छोटीशी होळी पेटवण्यात आली, या होळीचे पूजनही त्यांनी केले. रंगांची उधळण करून नृत्यांचा आस्वाद घेतला आणि मुलांनी बनविलेली भेळ सर्वांना वाटण्यात आली. याचप्रमाणे विश्वास गतिमंद संस्थेतही शिक्षक, स्वयंसेवकांबरोबर धुळवड साजरी केली. (प्रतिनिधी)
दिव्यांगांची नैसर्गिक रंगांची धुळवड
By admin | Updated: March 12, 2017 02:44 IST