अंबरनाथ : अंबरनाथच्या पंचायत समितीकडून राबवण्यात आलेल्या आवास योजनेच्या पुरस्कारांचे वितरण शनिवारी अंबरनाथ पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले. मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण पार पडले.
राज्यभरात २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत महाआवास अभियान राबवण्यात आले. या योजनेच्या लाभार्थींसाठी विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्वोत्कृष्ट घरकुल, राज्य पुरस्कृत सर्वोत्कृष्ट घरकुल, प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत आणि राज्य पुरस्कृत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत, तसेच सर्वोत्कृष्ट क्लस्टर अशा स्पर्धांचा समावेश होता. त्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्वोत्कृष्ट घरकुलाचा मान रहाटोलीच्या चंद्रकांत दिवेकर यांना मिळाला, तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक अनुक्रमे कुंडलिक जाधव आणि यमुना जाधव यांनी मिळविला. राज्य पुरस्कृत सर्वोत्कृष्ट घरकुलाचा मान वांगणीच्या अंकुश गायकवाड यांना, तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक अनुक्रमे भरत पवार आणि राजेंद्र जाधव यांना मिळाला. प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा मान दहिवली ग्रामपंचायतीला मिळाला, तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक अनुक्रमे हाजी मलंगवाडी आणि वांगणी ग्रामपंचायतीला मिळाला. तर राज्य पुरस्कृत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा मान चामटोली ग्रामपंचायतीला मिळाला. चरगाव आणि आंबेशिव या ग्रामपंचायतींना अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला. प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्वोत्कृष्ट क्लस्टर योजनेचा मान हाजी मलंगवाडी ग्रामपंचायतीला मिळाला, तर राज्य पुरस्कृत सर्वोत्कृष्ट क्लस्टरचा मान चरगाव ग्रामपंचायतीला देण्यात आला. यातील विजेते आणि ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा सत्कार आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
तालुक्यात आणि मतदारसंघात आवास योजना यशस्वीपणे राबविण्यास आपण नेहमीच प्राधान्य दिल्याचे यावेळी आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.
---------------------------------------------
फोटो-