कल्याण : एकीकडे आर्थिक चणचणीत कंत्राटदारांची बिले तसेच केडीएमटीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात प्रशासनाची कसरत चालू असताना दुसरीकडे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या दालनावर मात्र लाखोंची उधळपट्टी सुरूच आहे. आता नवनिर्वाचित उपमहापौरांच्या दालनाचे नूतनीकरण केले जाणार आहे. दालनांच्या नूतनीकरणावर वारंवार होणारा खर्च पाहता या उधळपट्टीचे फलीत काय? असा सवाल उपस्थित होत आहे.शिवसेनेने तळमजल्यावरचे दालन जैसे थे ठेवले आहे. भाजपाने मागील ९ जागांवरून थेट ४३ जागा वाढल्याने मोठे दालन मिळावे, अशी मागणी केली होती. त्यांनी पहिल्या मजल्यावरील प्रशस्त अशा मनसेचे दालन व सचिव कार्यालयाची काही जागा मागितली होती. त्यानुसार त्यांना जागा देण्यात आली आहे. तर मनसेला तळमजल्यावरील प्रशस्त असे काँग्रेसचे दालन देण्यात आले आहे. चार नगरसेवक असलेली काँग्रेस पहिल्या मजल्यावरील पूर्वीचे भाजपाचे दालन वापरत आहे. तर दोन नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीला तळमजल्यावर दालन देण्यात आले आहे. या दालनांसह महिला बालकल्याण समितीच्या सभापतींच्या दालनाचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आले आहे. कोणत्याही पदाधिकाऱ्याने नव्याने पदभार स्वीकारताच लागलीच त्याच्या सोयीनुसार दालनांमध्ये बदल केले जातात आणि या नूतनीकरणावर लाखोंची उधळपट्टी केली जाते. भाजपाच्या गटनेता कार्यालयाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र लाखो रुपये खर्चून उभारलेल्या या दालनाला काही दिवसांतच गळती लागल्याने छताला असलेल्या पीओपीचे नुकसान झाले. यातून पालिकेच्या भोंगळ कारभाराचा नमूना पहावयास मिळाला होता. दरम्यान, आता उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या दालनाचेही नूतनीकरण केले जाणार आहे. माजी उपमहापौर विक्रम तरे यांनी यासंदर्भात प्रशासनाला पत्रव्यवहार केला होता. उपमहापौर कार्यालय वगळता अन्य पदाधिकाऱ्यांच्या दालनांचे नूतनीकरण करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
उपमहापौरांच्या दालनांवर उधळपट्टी
By admin | Updated: March 22, 2017 01:21 IST