लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : केडीएमसी हद्दीतील नागरी समस्या सोडवण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी जनतेच्या सहभागाशिवाय या समस्या सुटणे अशक्य आहे. त्यामुळे महापालिकेच्या उपक्रमांमध्ये त्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी येथील ‘दिलखुलास संवाद’ कार्यक्रमात केले. कल्याण-डोंबिवली पत्रकार संघातर्फे मंगळवारी हा कार्यक्रम झाला. या वेळी महापौरांनी पत्रकार आणि उपस्थित नागरिकांशी संवाद साधत शहरातील विविध समस्या आणि भविष्यातील योजना याबाबत आपले विचार मांडले. सध्या शहरात भेडसावणारा डम्पिंगचा प्रश्न असो अथवा फेरीवाला अतिक्रमणाचा विषय, याबाबत बोलताना महापौरांनी या समस्या निकाली काढण्यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. महापालिकेची आर्थिक स्थिती आणि उपलब्ध असलेले मनुष्यबळ यात आमचे प्रयत्न अपुरे पडत असतील. मात्र, आमचा प्रयत्न सुरूच राहील. परंतु, नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेणे काळाची गरज असल्याचे देवळेकर म्हणाले.आम्ही फेरीवाल्यांविरोधात कारवाई करतो. परंतु, ज्या वेळी नागरिक त्यांच्याकडून वस्तू खरेदी करणे थांबवतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने या समस्येला आळा बसू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. उत्तम आरोग्यसेवा, चांगली उद्याने, करमणूक आणि मनोरंजनाच्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘स्मार्ट सिटी’द्वारे सकारात्मक बदल झालेले पाहावयास मिळतील, असा दावाही त्यांनी केला. २७ गावांचा महापालिकेत समावेश झाला आहे. मात्र, सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही नागरी सुविधा तेथील विकास प्रकल्पांची सांगड घालून तेथील नागरिकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आहे. कल्याणची ऐतिहासिक परंपरा जोपासण्यासाठी दुर्गाडी किल्ल्याचे जतन करण्याबरोबरच लवकरच आरमार स्मारक उभारले जाईल. तसेच आरमार दिन साजरा करण्याची घोषणाही महापौरांनी केली.
लोकसहभागाशिवाय समस्या सुटणे कठीण
By admin | Updated: June 29, 2017 02:44 IST