ठाणे : कोरोनाला अटकाव करण्यासाठी लस उपलब्ध झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत ठाणे मनपा हद्दीतील तीन लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. परंतु, आता लसींचा तुटवडा निर्माण झाला असून, कोव्हिशिल्डचा अपुरा साठा येत आहे, तर कोव्हॅक्सिनचा साठाच येत नाही. यामुळे यापूर्वी ज्या नागरिकांनी लस घेतली आहे, त्यांना दुसरा डोस देताना अडचणी येत आहेत. त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीचा साठा तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सुरुवातीच्या काळात सर्वत्र कोविशिल्ड लस उपलब्ध होती. त्यानंतर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध झाल्यानंतर काही नागरिकांना पहिला डोस दिला आहे. परंतु, सद्य:स्थितीत कोव्हॅक्सिनचा साठा उपलब्ध नसल्यामुळे दुसरा डोस देणे गैरसोईचे झाले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी विहीत कालमर्यादा निश्चित केलेली आहे. यामुळे पहिला डोस घेतलेल्यांचा दुसरा डोस घेण्याचा कालावधी निघून जात असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वच नागरिक दुसऱ्या डोससाठी महापालिकेकडे सातत्याने विचारणा करीत आहेत.
त्यातच १ मे पासून १८ ते ४४ या वयोगटांतील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केले आहे. या वयोगटाला कोव्हॅक्सिनचाच डोस देण्यात येणार आहे. त्यांना कोव्हॅक्सिनचाच डोस देणे निश्चित केल्यास इतर ४५ वर्षे आणि त्यापुढील वयोगटांतील नागरिकांना तिचा दुसरा डोस उपलब्ध होणार नाही. त्याचबरोबर १८ ते ४४ या वयोगटांसाठी निश्चित केलेल्या लसीकरण केंद्रावर ज्यांना तिचा दुसरा डोस मिळाला नाही असे नागरिकदेखील गर्दी करतील, तर ४५ वर्षे आणि त्या पुढील नागरिकांना या केंद्रांवर डोस देण्यास मनाई केल्यामुळे ही मोहीम राबविणे गैरसोयीचे होणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.