मीरा रोड : महापालिकेच्या महिला दिन कार्यक्रमात झालेली धक्काबुक्की, गोंधळ, पालिकेच्या बोधचिन्हासह छापलेले बोगस गिफ्ट कुपन, वाटलेली बक्षिसे व शिष्टाचाराची केलेली ऐशीतैशी याप्रकरणी दीड महिना उलटला तरी प्रशासनाने कोणतीच कारवाई केलेली नाही. उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी तर कारवाईबाबत बोलणेच टाळले. म्हसाळ यांचे गैरप्रकारांना अभय असल्याने त्यांच्यावरच कारवाईची मागणी शिवसेनेने केली आहे. भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिम्पल मेहता या महिला बालकल्याण समितीच्या सभापती असून महिला दिनाचा पालिकेचा कार्यक्रम भाजपाने हायजॅक केला होता. निमंत्रणपत्रिकेपासून सर्वच कार्यक्रम भाजपाने ठरवल्याप्रमाणे राबवण्यात आला. त्यात सहकारी शिवसेनेला विश्वासात न घेताच शिष्टाचारही पाळला नाही. कार्यक्रमात गर्दी जमावी, म्हणून भाजपाच्यावतीने महिलांना पालिकेच्या नावे बोधचिन्ह असलेली गिफ्ट कुपन वाटली होती. गिफ्टच्या आशेने जमलेल्या महिलांना धक्काबुक्की, मारहाण झाली. त्यांना गिफ्ट तर सोडाच, साधे पाणी व नाश्ताही मिळाला नाही. महिलांनी संताप व्यक्त करत निघून जाण्यास सुरुवात करताच त्यांना थांबवण्यासाठी आमदार मेहतांनीच तुम्हाला गिफ्ट मिळणार, ज्यांना नाही मिळाले त्यांनी फोन करा. दोन गिफ्ट देईन, असे भाषणात सांगितले. त्यानंतर, गिफ्टवाटप सुरू करताच गोंधळ उडाला. परंतु, महिलांची साधी विचारपूसही केली नाही. दरम्यान, शिवसेनेने महिलांची फसवणूक, महिलादिनी झालेले हाल, बनावट गिफ्ट कुपन व पालिकेचा कार्यक्रम भाजपाने राबवल्यामुळे आक्रमक भूमिका घेत गुन्हे दाखल करण्यासह कार्यक्रमाचे देयक देण्यास विरोध चालवला होता. याप्रकरणी आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांना चौकशी करून कारवाई करण्यास सांगितले होते. दुसरीकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी उपायुक्तांसह पालिका अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला. पालिकेने गिफ्ट कुपन्स छापली नसल्याचे लेखी कबूल केले. परंतु, अजूनही पालिकेने संबंधितांवर गुन्हा दाखल केलेला नाही. (प्रतिनिधी)
उपायुक्तांचे गैरप्रकाराला अभय
By admin | Updated: April 24, 2017 02:19 IST