ठाणे : डुबी व हातपाटी पद्धतीने रेतीउपसा करण्यास परवानगी देण्याच्या प्रमुख मागणीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाणे जिल्ह्यातील रेती व्यावसायिकांनी लाक्षणिक उपोषण व धरणे धरून जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांना निवेदन दिले. घोडबंदर ते डोंबिवली पट्ट्यातील शेकडो रेती व्यावसायिक व मजुरांनी या आंदोलनात सहभाग घेतला. यामध्ये डोंबिवली, मुंब्रा, पारसिक, कोलशेत, वाघबीळ, नागला, गायमुख, घोडबंदर, खारबाव, केवणी, कशेळी व काल्हेर येथील रेती उत्पादक सोसायट्यांचे पदाधिकारी व मजूर सहभागी झाले होते. येथील शासकीय विश्रामगृहाजवळ हे आंदोलन पार पडले. या आंदोलनाचे नेतृत्व रेती उत्पादक फेडरेशनचे दशरथ पाटील यांनी केले. घोडबंदर ते डोंबिवलीच्या सागरी पट्ट्यात वर्षानुवर्षापासून पारंपरिक पद्धतीने डुबी व हातपाटीने रेती व्यवसाय केला जातो. मात्र, आता सक्शन पंपाद्वारे बेसुमार रेतीउपसा या परिसरात सुरू आहे. त्यास विरोध करून डुबी व हातपाटीसाठी परवाने देण्यात यावे, उल्हास नदीच्या पात्राशेजारी रेती व्यवसायासाठी प्लॉट द्यावे, रेतीबंदर सुशोभीकरण व विकासाचा प्रस्ताव असल्यास रेती सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करावी आदी मागण्या या रेती व्यावसायिकांनी केल्या आहेत. डुबी व हातपाटी व्यावसायिकांना परवानेवाटप बंद केले आहे. त्याविरोधात संतापलेल्या रेती व्यावसायिकांनी ठाणे जिल्हा रेती उत्पादक सहकार सोसायटी फेडरेशनची स्थापना केली आहे. (प्रतिनिधी)
रेतीउपशासाठी धरणे आंदोलन
By admin | Updated: March 29, 2016 03:24 IST