- सदानंद नाईक उल्हासनगर : शहरातील बांधकाम व्यावसायिक व एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असलेले राजा गेमनानी यांच्याकडे काही जणांनी एका कोटीच्या खंडणीची मागणी केली. तसे तक्रार पत्र गेमनानी यांनी मुख्यमंत्री, गृहविभाग, पोलीस आयुक्त, उपायुक्त यांच्यासह अन्य जणांना दिले असून याप्रकाराने खळबळ उडाली आहे.
उल्हासनगरात बांधकाम व्यवसाय कोविड महामारीत जवळपास ठप्प पडले होते. परंतू त्यानंतर बांधकाम व्यवसायमध्ये तेजी आली असलीतरी, ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरवलेली असल्याने इमारती पूर्णतः रिकाम्या पडल्या आहेत. त्यामुळे बांधकाम व्यवसायिक हतबल झाले आहेत. बांधकाम व्यवसायिकाची अशी बिकट स्थिती आहे. मात्र काही समाजकंटक माहितीच्या आधारे बांधकामची माहिती गोळा करुन बिल्डरांकडुन मोठ्या प्रमाणात खंडणी उकळत असल्याची माहिती बांधकाम व्यवसायिक राजा गेमनानी यांनी दिली. त्यांनाही याप्रकाराला सामोरे जावे लागले असून त्यांच्याकडे १ कोटीची खंडणी काही जणांनी मागितली. याबाबतची तक्रार त्यांनी मुख्यमंत्री, गृहविभाग, ठाणे पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्यासह अन्य जणांना निवेदनाद्वारे तक्रार केली.
उल्हासनगर महापालिकेतील नगररचनाकार विभाग, बांधकाम विभागासह अन्य विभागात काही सामाजिक संघटनेचे व राजकीय पक्षाचे पदाधिकारी माहितीच्या आधारे माहिती घेतात. त्यानंतर पुणे संचालक नगररचना विभाग, कोकण आयुक्त आणि उल्हासनगर मनपा नगररचना विभागात खोटी तक्रार करुन ठिय्या आंदोलनची धमकी देऊन, अधिकाऱ्यां मागे चौकशीचा ससेमीरा लावतात. नंतर काही दलालाच्या मार्फत तडजोडसाठी दबाव टाकून एककोटी रुपयेची मागणी राजा गेमनानी यांच्याकडे केली. पैसे दिले नाहीतर, मंत्रालयात तक्रार करुन बांधकाम पाडण्याची धमकी देत आहेत. असे गेमनानी यांचे म्हणणे आहे. याप्रकाराने गेमनानी कुटुंब चिंताग्रस्त झाले.
शहरात अनेक बांधकाम व्यवसायकांना ही मंडळी ब्लॅकमेल करीत असून आपले बांधकामं वाचवण्यासाठी घाबरलेले बिल्डर तक्रार करण्यासाठी पुढे धजावत नाही. असेही गेमनानी म्हणाले. त्यांनी तक्रारीत काही जणांची नावे दिली आहेत. बांधकाम व्यावसायिक एकवटले ब्लॅकमेल करणाऱ्या मंडळी विरोधात बांधकाम व्यवसायिक एकवटले असून या सर्वांनी गेमनानी यांना पाठिंबा दिला आहे. असे गेमनानी यांचे म्हणणे आहे. काही दिवसापूर्वी शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे माहितीच्या आधारे करून, बिल्डरांना ब्लॅकमेल करीत असल्याची तक्रार केली.