स्कायवॉक राज्य महामार्गावरून न्या
By admin | Published: April 21, 2017 12:05 AM2017-04-21T00:05:09+5:302017-04-21T00:05:09+5:30
अंबरनाथ पश्चिमेत बांधण्यात आलेला स्कायवॉक हा राज्य महामार्गावरुन न नेता अलिकडेच उतरविण्यात आल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना
अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिमेत बांधण्यात आलेला स्कायवॉक हा राज्य महामार्गावरुन न नेता अलिकडेच उतरविण्यात आल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना राज्य महामार्ग ओलांडून स्कायवॉकचा वापर करावा लागत आहे. हा स्कायवॉक राज्य महामार्गावरुन नेण्यासाठी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी या स्कायवॉकची पाहणी केली.
एमएमआरडीएने स्कायवॉक बांधला आहे. स्कायवॉक राज्य महामार्गावरून नेण्यात येणार होता. मात्र खर्चाची बाब पुढे करत एमएमआरडीएने हा स्कायवॉक अर्धवट ठेवत तो थेट नगरपालिका कार्यालयासमोर उतरविला. त्यामुळे महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन राज्य महामार्ग ओलांडावा लागतो.
स्कायवॉक राज्य महामार्गावरुन नेण्याची सर्वच पक्षांनी मागणी केली. मात्र एमएमआरडीए हे काम करण्यास स्पष्ट नकार देत असल्याने राजकीय पक्षांनी पाठपुरावाच बंद केला. मात्र विद्यार्थ्यांना होणारा त्रास आणि या स्कायवॉकची गरज पाहता भाजपाचे जिल्हा विभाग उपाध्यक्ष किसन तारमळे यांनी एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस.मदान यांना हा स्कायवॉक पुढे जोडून देण्याची मागणी केली. स्कायवॉक रस्त्याच्या पलिकडे नेल्यास नागरिकांना रस्ता ओलांडण्याची गरज भासणार नाही, याची जाणीव करून दिली.
या संदर्भात तारमळे यांनी मागणी केल्यावर प्रत्यक्षात या स्कायवॉकची पाहणी एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता सुदर्शन गुंडला, उपअभियंता प्रशांत वाकोडकर हे अंबरनाथमध्ये आले होते. त्यांनी रस्ता आणि स्कायवॉकची पाहणी केली. तसेच या संदर्भात योग्य प्रस्ताव पाठविला जाईल असे स्पष्ट केले.
यावेळी तारमळे, नवीन शहा, भगवान सासे, नगरसेवक सुभाष साळुंखे, पालिकेचे उपअभियंता राजेश तडवी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)