ठाणे : आइस्क्रीम खाण्यासाठी खो-खो संघातील १४ वर्षांखालील खेळाडूंना घेऊन जाताना घोडबंदर रोडवरील रोड अपघातात अहमदनगरमधील एका तेरावर्षीय खेळाडूचा ३१ जानेवारी २०१६ रोजी अपघाती मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्या खेळाडूच्या वडिलांनी केलेल्या अर्जात संघ व्यवस्थापकाने निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला. त्यानंतर, सुमारे दोन वर्षांनंतर कापूरबावडी पोलीस ठाण्यात निष्काळजीपणाचा ठपका ठेवून याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कार्तिक हरदास (१३) असे त्या मयत खेळाडूचे नाव असून तो अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शाळेचा विद्यार्थी आहे. याप्रकरणी, अद्यापही कोणालाही अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.ठाण्यातील साकेत पोलीस मैदानात जानेवारी २०१६ रोजी राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धा आयोजिल्या होत्या. या स्पर्धेसाठी १४ वर्षांखालील गटातील विविध जिल्ह्यांतून खो-खो संघ ठाण्यात आले होते. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा संघ घेऊन संघ व्यवस्थापक सुमित सुनील चव्हाण हे ठाण्यात आले होते. तसेच या खेळाडूंसाठी आयोजकांनी राहण्याची व्यवस्था घोडबंदर रोडवरील एम्पिरिया बिल्डिंगमध्ये करून येजा करण्यासाठी बसची व्यवस्था केली होती. ३१ जानेवारी २०१६ रोजी रात्री चव्हाण हे रात्रीचे जेवण झाल्यानंतर संघातील १० खेळाडूंना घेऊन आइस्क्रीम खाण्यासाठी घोडबंदर रोडवरील आर मॉल परिसरात जात होते. या वेळी, त्यांनी रोडवर डिव्हायडर व त्यावर रेलिंग असतानाही प्रतिबंधित दुभाजकावरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अनोळखी वाहनाने कार्तिकला धडक दिल्याने गंभीररीत्या जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्या वेळी अनोळखी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला होता.याचदरम्यान, मयत कार्तिक हा हरदास कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. शिक्षक असलेल्या कार्तिकच्या वडिलांना सर्व खेळाडू हे १४ वर्षांखालील असताना त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी ही संघ व्यवस्थापक चव्हाण यांची होती. तरीदेखील, त्यांनी १० खेळाडूंच्या सुरक्षिततेचा विचार न करता रस्ता ओलांडताना कार्तिकचा मृत्यू झाल्याचे वारंवार अर्जाद्वारे निदर्शनास आणून दिले. त्या अर्जानुसार अखेर १ डिसेंबर २०१७ रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात संघ व्यवस्थापक सुमित चव्हाण यांच्याविरोधात निष्काळजीपणाचा ठपका ठेवून गुन्हा दाखल केल्याची माहिती तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक (गुन्हे) के.ए. कर्पे यांनी दिली.‘‘हे प्रकरण जरी जुने असले, तरी मयत मुलाच्या वडिलांनी केलेल्या अर्जात निष्काळजीपणा केल्याचे स्षष्टपणे दिसत आहे. विशेष बसची मागणी करून किंवा झेब्रा क्रॉसिंग करून रस्ता ओलांडताना त्याक डे दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.’’ - बी.टी. बरावरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कापूरबावडी
खो-खो खेळाडूंच्या मृत्यूप्रकरणी; अहमदनगर जिल्हा संघ व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 18:30 IST
रस्ता ओलांडताना, झालेल्या अपघातप्रकरणी मयत खेळाडूच्या हा अपघात निष्काळजीपणाने झाला आहे. याबाबत सातत्याने त्या खेळाडूच्या पित्याने वारंवार केलेल्या पाठपुरावानंतर,सुमारे दोन वर्षानंतर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून गुन्हा दाखल झाला आहे. अशाप्रकारे, त्या खेळाडूच्या पित्याला यश आले आहे.
खो-खो खेळाडूंच्या मृत्यूप्रकरणी; अहमदनगर जिल्हा संघ व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल
ठळक मुद्दे निष्काळजीपणा केल्याप्रकरणी सुमारे दोन वर्षांनी ठाण्यात गुन्हा दाखलयाप्रकरणी,संघ व्यवस्थापकाला अद्यापही कोणालाही अटक केली नाही