- सुरेश लोखंडेठाणे : येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास लागून असलेल्या येऊरच्या जंगलात मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. सुमारे तीन दिवसांच्या कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या या मादीचा मृत्यू दोन बिबट्यांमधील भांडणात गंभीररीत्या जखमी झाल्यामुळे झाल्याचे येऊर येथील वनविभाग कार्यालयाने स्पष्ट केले.येऊर जंगलाच्या पूर्वेकडील चिखलाचापाडा परिसरातील झुडुपांत ती मृतावस्थेत आढळून आली होती. गंभीर जखमी झालेल्या या मादीचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे शवविच्छेदनावरून निदर्शनात आल्याचे येऊर परिक्षेत्र वनअधिकारी राजेंद्र पवार यांनी लोकमतला सांगितले. मृत बिबट्या शनिवारी चिखलाचापाड्याजवळील झुडुपांत वनविभागाच्या गस्ती पथकास आढळून आला. कुजलेला मृत बिबट्या बाहेर काढून त्याचे शवविच्छेदन संजय गांधी राष्टÑीय उद्यानाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात केले. या अहवालास अनुसरून चार वर्षांच्या मादी बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. दोन बिबट्यांच्या भांडणातून हा मृत्यू झाल्याचा दावा पवार यांनी केला.तिच्या मानेकडील भागावर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला आढळून आला. तोंडावरही मोठ्या प्रमाणात जखमा आढळल्या असून ते छिन्नविछिन्न झाले होते. यावरून मान व तोंडाचे लचके तोडल्याचा संशय आहे. यावरून दोन बिबट्यांच्या भांडणात गंभीर जखमी झालेल्या तिने पळ काढून झुडुपांत आश्रय घेतला. त्यानंतर, तिला अन्यत्र जाता आले नाही आणि ती तिथेच मृत झाली. त्यानंतर, चार दिवसांनी गस्तीवरील पथकास तिची चाहूल लागली. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर तिचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्याचे वनविभागाने सांगितले.
येऊरमधील त्या मादीचा मृत्यू बिबट्यामधील भांडणामुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 07:11 IST