कल्याण : एका ३४ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली केडीएमसीतील भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकर यांच्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चेहऱ्यावर ॲसिड टाकण्याची धमकी देण्याबरोबरच सोशल मीडियावर अश्लील मेसेज आणि फोटो टाकून बदनामी केल्याचा आरोपही या युवतीने गायकर यांच्या विरोधातील तक्रारीत केला आहे.
गायकर हे मनपात २००५ ते २०१० आणि २०१५ ते २०२० या कालावधीत नगरसेवक होते. स्थायी समितीचे सभापतिपदही त्यांनी भूषविले आहे. दरम्यान, त्यांच्याविरोधात बुधवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. वारंवार पाठलाग करणे, समाजात व नातेवाईकांमध्ये बदनामी करेल, ॲसिड टाकून चेहरा खराब करेल, तुला सोडणार नाही, अशा प्रकारे धमकी देत तसेच विनयभंग केल्याचे या युवतीचे म्हणणे आहे.
आपल्या जुन्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अश्लील मेसेज व फोटो टाकून सोशल अकाऊंट्स व व्हॉट्सॲपवर बदनामी केल्याचाही आरोप तिने केला आहे. पश्चिमेकडील आधारवाडी चौक, आग्रा रोड आणि वायलेनगर परिसरात हे प्रकार २०१९ ते ६ सप्टेंबर २०२१ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, याप्रकरणी गायकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, त्यांचा फोन स्वीच ऑफ होता.
-----------------