ठाणे : ठाणे महापालिकेच्या हद्दीत यापुढे दूषित पाणी किंवा रस्त्यावर खड्डे आढळल्यास थेट पोलीस ठाण्यात तक्र ार करण्याचा इशारा देऊन सत्ताधारी शिवसेनेला माजी महापौर अशोक वैती यांनी शनिवारी महासभेत घरचा आहेर दिला.या महासभेत पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करताना वैती यांनी सांगितले की, लुईसवाडी परिसरात मागील काही दिवसांपासून दूषित पाणी येत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना उलट्या, अतिसार आदींचा त्रास होत आहे. याबाबत, तक्र ार करूनही अद्याप त्यावर कोणतेच उपाय केलेले नाहीत. त्याचप्रमाणे याच परिसरातील महापालिकेच्या शाळेची भिंत चार महिन्यांपूर्वी पडली होती. अद्यापही तिच्या दुरुस्तीचे काम झालेले नाही. याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. परंतु, त्यानंतरही प्रशासनाकडून ठोस असे उत्तर न आल्याने संतापलेल्या वैती यांनी यापुढे दूषित पाणी आणि रस्त्यावर खड्डे पडल्यास थेट पोलीस ठाण्यात तक्र ार करू आणि मग हे प्रकरण न्यायालयात जाईल, असे ठणकावले. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्याच एका ज्येष्ठ नगरसेवकाने भूमिका घेतल्याने ठाणे महापालिकेत सत्ताधारी नगरसेवकांना कशा प्रकारे आपल्या हक्कासाठी झगडावे लागते, याची पुन्हा एकदा प्रचीती आली. सत्तेत राहून करायचे काय?दुसरीकडे शिवसेनेच्या नगरसेविका राधाफतेबहादूर सिंग यांनीदेखील आपल्या प्रभागातील पाण्याच्या समस्येबाबत जाब विचारला. परंतु, प्रशासनाकडून कोणतेच उत्तर येत नसल्याने सत्ताधारी पक्षातील रिपाइंचे नगरसेवक रामभाऊ तायडे यांनी येथे सत्ताधाऱ्यांनाच न्याय मिळत नसेल तर सत्तेत राहून करायचे काय, असा सवाल केला. त्यांनी हे विधान करताच महापौर संजय मोरे यांनी सचिवांना दुखवट्याचे ठराव वाचण्यास सांगून महासभा तहकूब केली.
दूषित पाण्यासाठी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा?
By admin | Updated: February 21, 2016 02:42 IST