ठाणे : ड्रग्जच्या तस्करीमध्ये सहा वर्षांची शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या जॉन फ्रान्सिस उर्फ ओनाह येलबर्ट उर्फ जॉन जेम्स (४५) या नायजेरियन आरोपीला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी गुरुवारी दिली. फ्रान्सिस याच्याकडून ६६ लाखांचे एमडी जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.
अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अलिकडेच दिले होते. याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी ही कारवाई केली. ठाण्यातील शीळ, डायघर, खिडकाळी रोड, देसाई नाका भागात एक नायजेरियन एमडीच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्याच आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल म्हस्के, सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे, जगदीश गावीत आणि उपनिरीक्षक दीपेश किणी यांच्या पथकाने १२ जानेवारी रोजी देसाई नाका येथील रिव्हरवूड पार्कसमोर सापळा लावून जॉन जेम्स याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत ६६ लाख १८ हजारांचा ६६१.८ ग्राम वजनाचा एमडी मेफेड्रॉन हा अमली पदार्थ हस्तगत केला. याप्रकरणी एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. त्याला १७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
फ्रान्सिसला १२ जानेवारी २०१९ राेजी मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विराेधी पथकाने एक किलाे काेकेनसह अटक केली हाेती. याच गुन्ह्यात त्याला सहा वर्षांची शिक्षाही झाली. शिक्षा भाेगून ताे १३ नाेव्हेंबर २०२४ राेजी कारागृहातून सुटला. त्यानंतर पुन्हा एमडीची तस्करी करतांना ठाणे अंमली पदार्थ विराेधी पथकाने त्याला अटक केली.