ठाणे : नव्या बसेस दाखल झाल्याने ठाणे परिवहनला सुगीचे दिवस येण्याऐवजी ठेकेदारालाच अच्छे दिन आल्याचे चित्र आहे. ठेकेदाराच्या अवघ्या ३३ बसेस रोज वेळेत सुटत असून परिवहनच्या ताफ्यातील बसेसचा घोळ मात्र अद्यापही सुटू शकलेला नाही. बुधवारी परिवहनच्या केवळ १२० च्या आसपास बस रस्त्यावर धावल्या असून ३० एसीपैकी केवळ १८ बस रस्त्यावर धावल्या. परंतु, दुसरीकडे ठेकेदाराच्या बस मात्र रस्त्यावर सुसाट धावत असून त्यामुळे त्याला रोज पावणेतीन लाखांचे उत्पन्न मिळत आहे. परंतु, दुसरीकडे परिवहनचे उत्पन्न मात्र २५ लाखांवरून २१ लाखांच्या घरात आले आहे. याचाच अर्थ असा ठेकेदार नफयात तर परिवहन सेवा मात्र नुकसानीत असाच घ्यावा लागणार आहे. जेएनएनयूआरएमच्या २०० बस आता परिवहनच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने येत आहेत. यात ३० एसी बस तर साध्या ३३ बसेस परिवहनमध्ये दाखल झाल्या आहेत. परंतु, या बस ठेकेदाराकरवी चालवल्या जात असून प्रॉफिटमध्ये असलेले मार्ग मिळाल्याने सध्या त्याला अच्छे दिन आले आहेत. या नव्या बस दाखल होत असताना परिवहनच्या गाडाही रूळांवर येईल, असा दावा करण्यात आला होता. परंतु, प्रशासनाचा हा दावा फोल ठरला असून परिवहनच्या बसची संख्या रोडावली आहे. नवीन बस दाखल होण्यापूर्वी परिवहनच्या ताफ्यातून वागळे आणि कळवा आगारातून १९० ते २१० च्या आसपास बस रस्त्यावर धावत होत्या. मात्र, नव्या बसेस परिवहनमध्ये दाखल झाल्यानंतर या बसची संख्या तब्बल १२० पर्यंत घसरली आहे. विशेष म्हणजे अचानकपणे या बसची संख्या कशी रोडावली, असा सवाल आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. केवळ ठेकेदाराला नफा व्हावा म्हणून की काय? परिवहन आपल्या ताफ्यातील बस रस्त्यावर उतरवत नाही ना, असा सवालही करण्यात येत आहे.सध्याच्या घडीला ठेकेदाराच्या रोजच्या दररोज ३३ बस रस्त्यावर धावत असून त्यापोटी त्याला दिवसाकाठी पावणे ते तीन लाखांचे उत्पन्न मिळत आहे. दुसरीकडे परिवहनच्या बसची संख्या १९० वरून १२० वर घसरल्याने परिवहनचे उत्पन्नदेखील २५ लाखांवरून थेट २१ लाखांवर आले आहे. विशेष म्हणजे परिवहनच्या एसी बसची संख्या ३० असतानाही बुधवारी केवळ १८ बस रस्त्यावर धावल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
ठेकेदार नफ्यात तर परिवहन नुकसानीत
By admin | Updated: November 17, 2016 07:02 IST