शेणवा : उन्हाच्या तडाख्यात शहापूर तालुक्यातील नदीनाल्याची पडत असलेली कोरडी पात्र आणि विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने ग्रामीण भागातील गाव खेड्यापाड्यांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पिण्याच्या पाण्याचे एकमेव स्रोत असलेल्या विहिरी, बोअरवेल, हातपंप, नळजोडणीचे गढूळ व दूषित होऊ लागले असून, हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल शहापूर उपभूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळा अनुजैविक तज्ज्ञांनी दिल्याने रहिवाशांना साथीच्या आजारांच्या भीतीसह पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या विविध गावपाड्यातील जानेवारी महिन्यात ३५४, फेब्रुवारीत २५३ व मार्च महिन्यात १७३ अशा अडीच महिन्यांत एकूण ७८० पिण्याच्या पाण्याचे नमुने भूजल सर्वेक्षण उपविभागाच्या शहापूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी आले होते. यातील दोन महिन्यांच्या ६०७ नमुन्यांच्या तपासाअंती ११ गावांतील पाण्याचे नमुने दूषित असल्याचे आढळून आले. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल अनुजैविक तज्ज्ञांनी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला दिला असून, यात डोळखांबजवळील गुंडे ग्रामपंचायतीतील वालशेत, कसारा ग्रामपंचायतीमधील नारळवाडी, शिरोळ उंंबरवाडी, मलेगाव नारायणगाव, शिरगाव जांभेगाव, मनेखिंड आष्टे, गेगाव चिखली, हिव सपाटपाडा या ग्रामपंचायत हद्दीतील आठ विहिरी, अल्याणी साखरवाडीतील बोरिंग, शेंद्रुण ग्रामपंचायत क्षेत्रातील हातपंप, तसेच वासिंद नळपाणी पुरवठा योजना अशा ११ जलस्रोतातील पिण्याचे पाणी हे गढूळ असल्याचा अहवाल दिला आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभाग प्रशासन व ग्रामसेवकांना कळविण्यात आले आहे. या दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरू नयेत म्हणून या पाण्याचा पिण्यासाठी वापर करू नये, तसेच खबरदारी म्हणून तातडीने जलसुरक्षा करणे यात टीसीएल पावडरने पाणी निर्जंतुक करणे अशा सूचना केल्या आहेत.