नितीन पंडित
भिवंडी - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी अनेकांचा मृत्यू झाला होता. तिसऱ्या लाटेचा सामना करताना राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी सक्षम असाव्यात, या उद्देशाने कोट्यवधी रुपयांचा निधी शासन देत असताना भिवंडी महानगरपालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आजपर्यंत निधी असूनही ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभे करू शकले नाही. एकूणच पालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर नसल्याचा आरोप स्थायी समिती सदस्य अरुण राऊत यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना लेखी तक्रारीद्वारे केला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भिवंडी शहर व ग्रामीण भागात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णांचे नाहक बळी जात होते. यापुढे अशा परिस्थितीत ऑक्सिजन अभावी एकाही रुग्णाचा मृत्यू होऊ नये या करीता शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना ऑक्सिजन स्वयंपूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ऑक्सिजन जनरेशन प्लांटसाठी राज्य शासनाकडून पाच कोटी रुपयांचा निधी २९ एप्रिल रोजी भिवंडी पालिकेकडे हस्तांतरित झाला आहे.
निधी प्राप्त झाल्यानंतर मनपा आयुक्तांनी खुदाबक्ष कोविड सेंटर त्या सोबत वऱ्हाळ देवी मंगल कार्यालय, प्रेमाताई पाटील हॉल याठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यास मान्यता दिली. खुदाबक्ष हॉल याठिकाणी ९६० आईएमपी ५६.६ सीयू.एम प्रति तासाचे ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणीसाठी १ कोटी ५६ लाख ८० हजार रुपयांचा ठेका मे. टेक्नामेटे इंटरप्रायझेस या कंपनीस दिला. प्लांट उभा करून देण्याची मुदत ४५ दिवसांची होती. ही मुदत संपून गेली असतानाही पालिका प्रशासनाने याबाबत कोणतेही गांभीर्य दाखवले नाही.
भविष्यात कोरोनाची तिसरी लाट उसळल्यास त्याचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन तयारीत नसल्याने त्याचा फटका पुन्हा एकदा शहरवासीयांना बसू शकतो, अशी भीती भिवंडी मनपाचे स्थायी समिती सदस्य अरुण राऊत यांनी व्यक्त केले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सदरचा ऑक्सिजन जनरेशन प्लांट लवकर कार्यान्वित करावा, अशी मागणी केली आहे.