बदलापूर : शहरात लसीकरण सुरू झाल्यापासून नागरिकांना पालिकेच्या नियोजनशून्य कारभाराला सामोरे जावे लागत आहे. बदलापूर शहरात नागरिक लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहेत; मात्र केंद्रावर आल्यानंतर नागरिकांचा हिरमोड होताना दिसत आहे.
लसीकरण केंद्रावर नागरिक सकाळपासूनच लस घेण्यासाठी रांगेत उभे असतात. पालिकेचे कर्मचारी केंद्रावर आल्यानंतर कोणत्या वयोगटातील लसीकरण असणार, हे वेळेवर कळवले जाते. याचा नाहक मनस्ताप या नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यातच स्थानिक नेते व सुरक्षारक्षक आपल्या ओळखीच्या नागरिकांना वशिल्याने लस मिळवून देत असल्याने सकाळपासून रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना ताटकळत रहावे लागते. अचानक दुसऱ्या डोससाठी लसीकरण होत असल्याने रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांचा चांगलाच गोंधळ पाहायला मिळत आहे. कूपन देण्यावरूनही वाद असून, अचानक कूपन न देण्याचा निर्णय घेतला जातो. ही परिस्थिती बदलण्याची मागणी नागरिक करीत आहेत.