ठाणे : हिरानंदनी इस्टेटमध्ये उंचचउंच टॉवरचे बांधकाम जोरात सुरू असून परराज्यांतूून येणारे शेकडो मजूर तेथे दिवसभर काम करतात. कामावर आल्यावर मजुरांची हजेरी घेतली जात नाही. सायंकाळी मजुरी देतानाच हजेरी होते. त्यामुळे शुक्रवारी मातीचा ढिगारा कोसळून १० ते १२ मजूर आत अडकल्याची भीती व्यक्त केली गेली, तेव्हा मजुरांची नोंद नसल्याने ढिगारा उपसला जाईपर्यंत मजुरांचा हिशेब लागला नाही. एक मजूर बेपत्ता असल्याचा दावा कामावर असलेल्या कामगारांनीच केला.दुपारच्या जेवणाच्या सुटीनंतर मजूर पुन्हा बांधकाम साइटकडे निघाले, तेव्हा अचानक ७ ते ८ मीटर परिसरातील मातीचा ढिगारा कोसळला. क्षणभर कितीजण गाडले गेले, ते कुणालाच कळले नाही. ढिगारा उपसल्यानंतर दोन मजुरांवर काळाने झडप घातल्याचे स्पष्ट झाले. बांधकाम सुरू असल्याने तो रस्ता रहदारीला बंद केला होता. मात्र, मजूर शॉर्टकट म्हणून त्याचाच वापर करत होते. तो मृत्यूचा मार्ग ठरला.दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. इमारतीच्या पायाचे काम सुरू असल्याने जेसीबी मशीनवर काम करणाऱ्या मंडळींनी तो प्रकार पाहिला आणि ठेकेदाराच्या निदर्शनास आणून दिले. लागलीच जेसीबीने मातीचा ढिगारा उपासण्याचे काम सुरू केले. मात्र, आतमध्ये कुणी जिवंत माणूस अडकला असेल, तर त्याला इजा होऊ शकते, हे लक्षात आल्याने ठामपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दुर्घटनेची खबर दिली. तब्बल दोन तासांनंतर पहिल्या मजुराचा मृतदेह ढिगाऱ्याबाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर, जवळपास एक तासाने दुसरा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मजुरांची हजेरी होत नसल्याने कोण गेला, त्याच्या खातरजमेसाठी अन्य मजुरांना बोलावण्यात आले. मृतदेहाचा चेहरा पाहण्यासाठी मजुरांनी गर्दी केल्याने पोलीस आणि मजुरांत धक्काबुक्की झाली. (प्रतिनिधी)
कामावरील मजुरांची नोंद नसल्याने गोंधळ
By admin | Updated: December 24, 2016 03:09 IST