सदानंद नाईक, उल्हासनगर : शासकीय प्रसूतीगृहात मध्यरात्री भुलतज्ञ डॉक्टर व रुग्णवाहिका चालक ऑनड्युटी घरी झोपल्याने व १०८ क्रमांकाची अॅम्ब्युलन्स न आल्याने, गरोदर महिलेला खाजगी रुग्णवाहिकेने इतर रुग्णालयात हलविण्याची वेळ नातेवाईकावर आली. मनसेने याबाबत निवेदन दिल्यावर डॉक्टरसह रुग्णवाहिका चालकाला रुग्णालय अधीक्षक डॉ दोडे यांनी नोटीसा काढल्या आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील शासकीय महिला प्रस्तुतीगृह रुग्णालयात दोन दिवसापूर्वी मध्यरात्री २ वाजता ऐक महिला अंबरनाथवरून प्रसूतीसाठी आली होती. डॉक्टरांच्या तपासणीत मुलाने पोटात शी केल्याने, महिलेची शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. मात्र भूलतज्ञ् डॉक्टरांची तब्येत बरोबर नसल्याने, त्या आल्या नव्हत्या. तर पुढील उपचारासाठी कळवा येथे हलविण्यासाठी शासनाची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका वेळेत आली नाही. तर रुग्णालय रुग्णवाहिकेचा चालक ऑनड्युटी घरी झोपला होता. त्याला फोन करूनही तो फोन उचलत नव्हता. रुग्णालयात तासिकेवर ठेवण्यात आलेले कंत्राटी डॉक्टरही आले नाही.
शासकीय प्रसूतीगृह रुग्णालयाच्या या गोंधळी कारभाराने महिला व बालकाच्या जीवाला धोका निर्माण झाला. अखेर नातेवाईकांनी खाजगी रुग्णवाहिका बोलावून महिलेला कळवा रुग्णालयात हलविले. त्याठिकाणी महिलेची नैसर्गिक प्रसूती होऊन आई व मुलाची तब्येत ठणठणीत आहे. रुग्णालयात झालेला प्रकार मनसेची जिल्हाप्रमुख बंडू देशमुख व शहरप्रमुख संजय घुगे यांना समजल्यावर त्यांनी बुधवारी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ डोडे यांना धारेवर धरून कामात हलगर्जीपणा करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी मनसेचे शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.