आयोगाच्या अध्यक्षांवर तक्रारींचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2023 01:08 PM2023-05-24T13:08:44+5:302023-05-24T13:08:53+5:30
रुपाली चाकणकर : राज्यात सर्वाधिक तक्रारी ठाणे जिल्ह्यातील
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत मी २४ जिल्ह्यांचा आढावा घेतला. त्यात आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक १७४ तक्रारी प्राप्त झाल्या. यात कौटुंबिक समस्येच्या ११६, सामाजिक समस्येच्या १८, मालमत्तेसंदर्भातील नऊ, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासाच्या पाच आणि इतर २६ तक्रारींचा समावेश होता, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या तक्रारींवर तातडीने सुनावणी घेऊन संबंधित विभागांना त्याचे निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी आयोगाच्या सदस्य गौरी छाब्रिया, उत्कर्षा रूपवते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अतिरिक्त जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, अति. पोलिस आयुक्त पंजाबराव उगले, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार, उपस्थित होते. चाकणकर म्हणाल्या की, ठाणे जिल्ह्यात १८ बालविवाह रोखले आहेत. कोविड काळात बालविवाहाची संख्या महाराष्ट्रात वाढली. रोखलेल्या बालविवाहांची कागदावरील संख्या १८ असली तरी प्रत्यक्षात ही संख्या तीनअंकी आहे. बालविवाहाची मोहीम युद्धपातळीवर रोखण्यासाठी आशा वर्कर, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका यांना सोबत घेऊन ती राबवण्याचे आदेश दिले आहे.
जानेवारी ते एप्रिलपर्यंत अपहरणाच्या ३६ घटना
ठाणे ग्रामीणमध्ये जानेवारी ते एप्रिल २०२३ अपहरणाच्या ३६ घटना घडल्या असून त्यापैकी २७ जणींची सुटका केली आहे, तर ९ जणींचा शोध सुरू आहे. ठाणे ग्रामीणमध्ये जाने. ते एप्रिल २०२३ मध्ये १२५ बेपत्ता होण्याच्या केस दाखल असून पैकी ९४ सापडल्या असून ३१ जणींचा शोध सुरू आहे