अंबरनाथ : एप्रिल २०२० मध्ये आलेल्या कोरोना लाटेत रुग्णांवर उपचार करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने बंद अवस्थेत असलेल्या डेंटल महाविद्यालयाला कोविड रुग्णालयात रूपांतर करून त्या ठिकाणी उपचार सुरू केले होते. जानेवारी २०२१ मध्ये रुग्णांची घटलेली संख्या पाहून पालिकेने हे रुग्णालय बंद करण्याची तयारी सुरू केली होती, मात्र अचानक कोरोनाची लाट पुन्हा आल्याने हे रुग्णालय नव्याने सुरू करण्यात आले असून याठिकाणी ऑक्सिजन बेडची संख्याही वाढविण्यात आली आहे.
शहरातील सर्वात मोठे कोविड रुग्णालय अंबरनाथ नगरपालिकेने डेंटल कॉलेजमध्ये उभारले आहे. सुरुवातीला या रुग्णालयात शंभर बेडचे ऑक्सिजन कक्ष आणि ३०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले होते. पालिकेने ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणी ४०० बेडचे ऑक्सिजन कक्ष उभारले. मात्र, ऑक्सिजन उभारल्यापासून या ठिकाणी रुग्णांची संख्या घटत गेली. त्यामुळे या ठिकाणची यंत्रणा बंद करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली होती. एवढेच नव्हे, तर पालिकेने हे रुग्णालय चालविण्यासाठी एका खासगी संस्थेलाही दिले होते. रुग्ण नसतानादेखील त्या संस्थेला पालिका बिल देत होती. मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा हे रुग्णालय नव्याने सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी आजच्याघडीला ६०० हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही संख्याही कमी पडत असल्याने पालिकेने यूपीएससी सेंटरमधील इमारत ताब्यात घेऊन त्याठिकाणीही ऑक्सिजन बेड सुरू करण्याचे काम हाती घेतले आहे. कोरोनाची लागण झालेल्या परंतु धोका नसलेल्या रुग्णांना ठेवण्यासाठी पालिकेने ओर्चीट येथील इमारत ताब्यात घेतली होती. मात्र, कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने ही इमारत बांधकाम व्यवसायाला पुन्हा देण्यात आली, त्यामुळे आता सीसीसी कक्ष खुंटवली येथील बहुभाषिक शाळेत आणि भाऊसाहेब परांजपे शाळेत सुरू करण्यात आले आहे.
डॉक्टर, परिचारिकांची संख्या कमी
अंबरनाथ नगरपालिकेच्या ६०० बेडच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांची संख्या जास्त असतानाही त्या ठिकाणी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी आहे. डॉक्टर आणि परिचारिका यांची संख्या अपुरी असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.