आॅनलाइन लोकमत ठाणे, दि. 04 - आपल्या साथीदाराच्या मदतीने रिक्षा चालकाने भांडूपच्या रंजीत सुर्वे (३२) या प्रवाशाला चाकूच्या धाकावर लुबाडल्याची घटना वागळे इस्टेट येथील मॉडेला चेकनाका येथे घडली. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.सुर्वे हे २९ जून रोजी पहाटे २.३० ते २.४५ वा. च्या सुमारास मॉडेला चेकनाका येथील दत्त मंदिरासमोरुन भांडूप येथे घरी जाण्यासाठी रिक्षात बसले. त्यावेळी त्यांच्या शेजारी रिक्षा चालकाचा मित्रही बसला. त्यानेच सुर्वे यांच्या गळ्यावर चॉपर ठेवून त्यांचा २२ हजार आणि १२ हजारांच्या दोन मोबाईलसह १० हजारांची रोकड असा ४४ हजारांचा ऐवज त्यांनी संगनमताने लुबाडला. याप्रकरणी त्यांनी ४ जुलै रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.महिनाभरात दुसरी घटना...एक महिन्यापूर्वी तीनहातनाका येथून रात्री ९.३० वा. च्या सुमारास बसलेल्या एका तरुणीलाही जबरी चोरीच्या प्रयत्नासह विनयभंगाचा प्रकार घडला होता. या घटनेतही रिक्षा चालकाचा साथीदार शेअर रिक्षाच्या नावाखाली आधीच त्या रिक्षात बसला होता. यातील आरोपींना पकडल्यानंतर त्यांनीही लुटीसाठीच त्या तरुणीशी झटापट केल्याची कबुली दिली होती. त्यामुळे शेअर रिक्षाच्या नावाखाली प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षा चालकांची टोळी कार्यरत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चॉपरच्या धाकावर रोकडसह हजारोंचा ऐवज लुबाडला
By admin | Updated: July 4, 2017 20:17 IST