कल्याण : कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी महापालिकेच्या अंदाजपत्रकाचे वाटोळे केले. अंदाजपत्रकात हस्तक्षेप करण्याची त्यांना एवढी हौस होती, तर ते महापौर कशाला झाले, असा टोला भाजपाचे स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांनी हाणला, तर केवळ टेंडर मंजूर करण्यासाठी स्थायी समितीची बैठक घ्यायची नसते. सभापतींनी खर्चाबरोबर महापालिकेच्या उत्पन्नाचादेखील आढावा घ्यायचा असतो, असा प्रतिटोला शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी गायकर यांना लगावला. सत्ताधारी शिवसेना-भाजपामध्ये २७ गावांतील विकासकामांवरून बेबनाव निर्माण झाल्याचे चित्र शुक्र वारच्या स्थायी समितीच्या सभेत दिसून आले. विशेष बाब म्हणजे शिवसेनेच्या महापौरांवर भाजपाकडून टीका होत असताना स्थायीतील शिवसेनेच्या सदस्यांनी मात्र चुप्पी साधली होती. कल्याण आणि डोंबिवलीतील काही रस्त्यांवरील जुने पथदिवे काढून नवीन एलईडी पथदिव्यांची व्यवस्था करण्याच्या कामाचे प्रस्ताव मंजुरीकरिता शुक्रवारच्या स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाकडून सादर झाले होते. यावरील चर्चेत २७ गावांमधील गोळिवली भागातील नगरसेवक तथा समिती सदस्य रमाकांत पाटील यांनी असा मुद्दा उपस्थित केला की, अंदाजपत्रकात गोळिवलीतील पथदिव्यांसाठी ८५ लाख, तर हायमॅक्ससाठी ५० लाखांच्या निधीची अंदाजपत्रकात तरतूद करूनही आजवर पथदिवे आणि हायमॅक्सची वानवा आहे. याचा जाब विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता यशवंत सोनवणे यांना विचारण्यात आला असता, त्यांनी अंदाजपत्रकात केवळ २५ लाखांची तरतूद केल्याचे स्पष्टीकरण दिले. यावर, सभापती गायकर यांनी थेट महापौर देवळेकर यांना लक्ष्य केले. महापौरांनी निधीच्या तरतुदीत कपात करून २७ गावांवर अन्याय केला आहे. महापौरांनी यापुढे संबंधित गावांचा कैवार घेऊ नये. उलटपक्षी, अन्याय केल्याची कबुली द्यावी, अशा शब्दांत गायकरांनी महापौरांना आव्हान दिले.
सभापती-महापौैर यांच्यात खडाजंगी
By admin | Updated: September 17, 2016 01:53 IST