ठाणे : येथील चैतन्य गणेशोत्सव मंडळाने प्रसारमाध्यम शाप की वरदान हा देखावा सादर केला आहे. यामध्ये कागद व पुठ्ठयाचा जास्तीत जास्त वापर केला आहे. विशेष म्हणजे यावर्षी दानपेटीत जमा झालेले व मंडळाकडे जमलेले पैसे दुष्काळग्रस्तांना देणार असल्याची माहिती संस्थेने दिली. मंडळाचे यंदाचे २८ वे वर्ष असून हा अनोखा देखावा उभा करायला जवळपास एक महिन्याचा कालावधी लागला आहे. या मध्ये किल्लारी भूकंप, इंद्राणी मुखर्जी प्रकरण, २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला, याकुब फाशी, दाभोळकर व पानसरे हत्या दाखवून माध्यमांच्या दोन्ही बाजू दाखविल्या.
या मखराची उंची १० फूट असून त्याची लांबी १५ मीटर व रुंदी २० मीटर आहे. गणपतीची मूर्ती प्लॅस्टर आॅफ पॅरिसची असून ७ फुटाची आहे. ती मदन नागोठणेकर यांनी तयार केली आहे. आरास बनविण्यासाठी ४० हजार रुपये खर्च आला असून कागद व पुठ्ठा वापरल्याने तो कमी आला आहे. दरवर्षी आरासमधून काहीतरी नाविन्य पूर्ण सजावट करणाऱ्या या मंडळाला गणपती आरास स्पर्धेत विविध पारितोषिके मिळाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष कैलास देशमुख यांनी दिली. त्यामुळे ही आगळी वेगळी आरास बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गणेश भक्तांची गर्दी होत आहे.