उल्हासनगर : शहरातील कॅम्प नं.-३ येथील निर्मला ज्यूस सेंटरसमोर पार्किंगच्या वादातून चाकूहल्ला झाला. याप्रकरणी दोघे गंभीर जखमी झाले असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आठ ते नऊ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.उल्हासनगर कॅम्प नं.-३ येथे पवन गुप्ता यांचे ज्यूसचे दुकान आहे. पोलिसांच्या सूचनेनुसार गुप्ता ज्यूसचे दुकान बंद करीत होते. त्या वेळी दोन तरुणांनी दुकानासमोर मोटारसायकल पार्किंग केली. दुकानाचे शटर बंद करीत असून मोटारसायकल बाजूला घ्या, असे सांगताच तरूणात व गुप्ता यांच्यात वादावादी झाली. तरुणांनी त्यांच्या सात ते आठ मित्रांना बोलवून गुप्ता व त्यांचा नोकर अलीवर चाकूने हल्ला केला. हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे. (प्रतिनिधी)
पार्किंगच्या वादातून चाकूहल्ला
By admin | Updated: February 13, 2017 04:57 IST