ठाणे : माजी महसूलमंत्री शांताराम घोलप यांचे मुरबाड तालुक्यातील धसई हे मूळ गाव नुकतेच कॅशलेस झाले. या परिसरातील जुनी बाजारपेठ म्हणून ओळखले जात आहे. मात्र, या गावात जास्तीतजास्त रोकडमुक्त व्यवहार करताना ग्रामस्थ व व्यापारी यांच्यात हुज्जत होत आहे. आवश्यक असलेल्या पीओएस यंत्रांसह व्यवहारासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. या कमी दूर करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन धसईच्या मदतीसाठी सरसावले आहेत. यानुसार आठवडाभरात गावात २४ पीओएस मशिन्स देऊन गावात महिनाभरात बँक आॅफ बडोदाची शाखा उघडण्यात येणार आहे.यासाठी प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे यांनी धसई गावातील बँकेचे अधिकारी, गावकरी, व्यापारी तसेच सरपंच, उपसरपंच, तलाठी यांची बैठक घेऊन प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला आहे. त्या सोडवण्यासाठी रूपरेषा आखण्याचे काम सुरू झाले आहे. सध्या या गावांत सुमारे ९६ नोंदणीकृत दुकानदार असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यापैकी केवळ ३६ जणांकडेच पीओएस मशिन्स आहेत. ही कमी दूर करण्यासाठी बँक आॅफ बडोदाकडून २४ मशिन्स पुढील आठवड्यापर्यंत मिळणार आहे. यानंतर, ६३ जणांकडे हे मशीन उपलब्ध होणे शक्य आहे. धसई परिसरातील पळू, मढ, उमरोली, परे, मिळे या गावांमध्ये ही शिबिरे घेण्यात येतील. यामध्ये दुकानदार आणि नागरिक यांना योग्य प्रशिक्षण देण्यात येणार असून ८ वीच्या वर्गातील मुले आणि सुशिक्षित युवक या तीन गटांना स्वतंत्र प्रशिक्षण देण्यात येईल. विजया बँक आणि ठाणे जिल्हा बँकेला या शिबिरांच्या दिवशी डेबिटकार्डवाटप करण्याची जबाबदारी दिली आहे. (प्रतिनिधी)
कॅशलेस धसईची मदार जिल्हाधिकाऱ्यांवर
By admin | Updated: December 26, 2016 06:59 IST