मीरारोड- भाईंदरच्या गणेश देवल नगर, शिमला गल्ली येथील महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या पहिल्या मजल्यावरील ८ शौचालयाचे गाळे बांधकाम, दरवाजा फ्रेम, शौचकूप आदी तोडून नुकसान केल्या प्रकरणी महापालिकेने उपठेकेदारावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शिमला गल्ली येथील शौचालय तोडून नव्याने बांधण्याचे कंत्राट महापालिकेनेजैनम इन्फ्रा ह्या ठेकेदारास मार्च २०२४ मध्ये दिले होते. १ कोटी १० लाखांच्या कंत्राटची मुदत संपल्याने पालिकेने मुदतवाढ दिली होती. पालिकेने कंत्राटदाराचे तर कंत्राटदाराने उपकंत्राटदार ह्याचे पैसे प्रलंबित ठेवल्याचे व काम कंत्राटदाराने दुसऱ्यास काम दिल्याच्या रागातून रविवारी काही लोकांनी शौचालयाच्या पहिल्या मजल्यावरील सुमारे ८ शौचा गाळ्याचे बांधकाम तोडून टाकले अशी चर्चा रंगली होती.
त्या नंतर महापालिकेचे कनिष्ठ अभियंता संदीप साळवे यांच्या फिर्यादी वरून भाईंदर पोलिसांनी सदर बांधकाम तोडून पालिकेचे सुमारे २ ते अडीज लाखांचे नुकसान केल्या बद्दल उपकंत्राटदार राजेश श्रावण खडतकर रा. साईछाया बिल्डिंग, भाईंदर टपाल कार्यालय जवळ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भाईंदर पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी सांगितले कि, सदर कामासाठी मूळ ठेकेदाराने उपठेकेदार नेमल्याचे आढळून आल्यास महापालिका त्याच्यावर तात्काळ कारवाई करेल.