डोंबिवली: वीजपुरवठा खंडित का केला याचा जाब विचारून विरार ग्रामीण कक्ष कार्यालयात घुसून शाखा अभियंत्याला मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. यासंदर्भात विरार ग्रामीण पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजित साळुंके, पूनम देसाई यांसह एक अज्ञात व्यक्ती अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. कौटुंबिक रजेनंतर सहायक अभियंता राजकुमार कल्लोळकर गुरुवारी विरार ग्रामीण कक्ष कार्यालयात कर्तव्यावर रुजू झाले होते. दैनंदिन कामकाज सुरू असताना तिन्ही आरोपींनी कार्यालयात घुसून वीजपुरवठा का खंडित केला याचा जाब विचारून शिवीगाळ सुरू केली. तर आरोपी अभिजित साळुंके याने कल्लोळकर यांना मारहाण केली. यात कल्लोळकर यांच्या नाकाला व कानाला जखमा झाल्या. कल्लोळकर यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा, जाणीवपूर्वक दुखापत करणे, संगनमत अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कर्तव्यावरील वीज कर्मचाऱ्यांना दमदाटी, मारहाण हा गंभीर स्वरूपाचा फौजदारी अपराध असून या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात अटकाव न करता सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने प्रसिद्धीपत्रकाद्वारे शुक्रवारी केले.