कल्याण : बिर्ला कॉलेज रोड येथील झोपड्या तोडून तेथील रहिवाशांना बीएसयूपी योजनेंतर्गत नव्या इमारतीत घरे देण्याचे आश्वासन केडीएमसीने दिले. मात्र, खाजगी सर्वेक्षण कंपनीने घोळ घातल्याने १४७ लाभार्थी घरापासून वंचित राहिले आहेत. त्यातच त्यांना दिलेल्या संक्रमण शिबिरातील घरेही तोडण्याची नोटीस महापालिकेने बजावली आहे.बिर्ला कॉलेज रोडजवळ इंदिरानगर झोपडपट्टी होती. तेथील ३३० झोपडीधारकांचे सुभाष असोसिएट्स या कंपनीने सर्वेक्षण केले. त्यानंतर त्यांना ‘बीएसयूपी’तील घरे देण्याचा करार करण्यात आला. त्यानुसार, त्यांना संक्रमण शिबिरात पर्यायी घरे दिली गेली. परंतु, घरे तयार झाल्यानंतर ३३० पैकी १८७ जणांना घरे दिली गेली. उर्वरित १४७ जणांना घरे मिळाली नाहीत. सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीमुळे घरे मिळत नसल्याचा आरोप या झोपडीधारकांनी केला आहे. त्यातच आता महापालिकेने संक्रमण शिबिरे पाडण्याची नोटीस बजावली आहे. दरम्यान, महापालिकेने त्यांच्याकडे २००९ च्या आधीपासून तेथे राहत असल्याचा पुरावा मागितला आहे. सर्वेक्षण कंपनीच्या घोळाचा फटका आम्हाला बसला आहे. त्यामुळे आम्ही जायचे कुठे, न्याय कोण देणार, असे प्रश्न लाभार्थी विचारत आहेत. याप्रकरणी त्यांनी पालिका आयुक्तांना शुक्रवारी निवेदन दिले आहे.
बीएसयूपीचे लाभार्थी बेघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 06:28 IST