शशी कर्पे, वसई वेतनश्रेणी आणि पदोन्नतीसाठी बी. एड आणि बीपीएडची पूर्णवेळ अभ्यासक्रमाची पदवी कामावर हजर राहून मिळविण्याचा पराक्रम वसईतील जिल्हा परिषदेच्या १२६ शिक्षकांनी साधला आहे. यातील एकाही शिक्षकाने बंधनकारक असलेली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची रितसर परवानगी हे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी घेतलेली नसल्याचेही उजेडात आले आहे.याप्रकरणी आता वसई पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली आहे. वेतनश्रेणी आणि पदोन्नतीसाठी वसईतील जिल्हा परिषदेच्या १२६ शिक्षकांनी नियमबाहय पदव्या मिळवल्याची माहिती लोकमतने गेल्या महिन्यात प्रसिध्द केली होती. आता वसई भाजपा अध्यक्ष मारूती घुटूकडे यांनी मिळवलेल्या माहितीच्या अधिकारातील माहितीत १२६ शिक्षकांनी बी. एड. आणि बीपीएड हा पूर्णवेळ एक वर्षाचा अभ्यासक्रम अभ्यासक्रम कामावर हजर राहून पूर्ण करण्याची किमया साधल्याची धक्कादाय माहिती उजेडात आली आहे. दिल्ली व उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा विद्यपीठासह अन्य राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयातून या शिक्षकांनी नियमबाहय पदव्या मिळवून पदोन्नती आणि वेतनश्रेणी लाटल्याचे त्यामुळे उजेडात आले आहे. १२६ पैकी ८१ शिक्षकांनी पत्राव्दारे (डिस्टन्स एज्युकेशन) अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी मिळवली आहे. यातील २१ शिक्षकांनी बीपीएड हा शरिरिक शिक्षणावर आधारित महाविद्यालयामध्येच राहून करावा लागणारा अभ्यासक्रम मराठवाडा या वसईपासून कोसो दूर असलेल्या विद्यापीठातून पूर्ण केला आहे. तर उर्वरित ६० शिक्षकांनी पत्राव्दारे अभ्यासक्रम पूर्ण करून बीएडची पदवी मिळवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बीपीएडीच पदवी आणि ती ही कोणतीही रजा न घेताच शिक्षकांनी मिळवल्याचे कागदपत्रांवरून उजेडात आले आहे. दोन्ही अभ्यासक्रमांसाठी द्यावे लागणारे बंधनकार पाठ कोणत्या शाळांमधून घेतले गेले? शाळांना असलेल्या सुट्टीच्या काळात कोणत्या शाळा यासाठी सुरू ठेवून शिक्षकांना शिकवले? असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. ज्या शिक्षकांनी पदवी मिळवण्यासाठी रजा घेतल्या त्यांनी आवश्यक कारण नोंदवलेले आढळून आलेले नाही. अनेक शिक्षकांनी उपभोगलेल्या रजेचा पगारही वरिष्ठांचया संगनमताने लाटल्याचेही उजेडात आले आहे. अभ्यासक्रमासाठी पुरेशी रजा न घेता एकाच वेळी मराठवाडयात परिक्षार्थी असलेले अनेक शिक्षक वसईतील आपापल्या शाळेत कामावर हजर होते. अशीही माहिती कागदपत्रांवरील नोंदीवरून उजेडात आली आहे.नियमबाहय पदव्या मिळवलेल्या एकाही शिक्षकाने शिक्षण विभागाची रितसर परवानगी घेतलेल्याची नोंद सेवा पुस्तकात करण्यात आलेली नाही. १२६ पैकी ४५ शिक्षकांनी नियमित विद्यपिठातीत जाऊन पदव्या मिळवल्याचे दाखवण्यात आले असताना फक्त १९ शिक्षकांच्या सेवा पुस्तिकातच रजेची नोंद आढळून आली आहे. मात्र, दोन्ही अभ्यासक्रमासाठी ३ महिने, दीड महिना, १५ दिवस अशा रजा घेतल्याच्या नोंदी सेवा पुस्तिकांमध्ये आहेत. हा घोटाळा उघडकीस आणून घुटूकडे यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केल्यानंतर वसई गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू करण्यात आली होती. याप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडुन जिल्हा परिषदेला चौकशी अहवाल पाठवण्यात आला आहे. त्यानंतर संबंधित शिक्षकांची वाढीव वेतनश्रेणी रोखण्यात आलेली आहे. याप्रकरणी संबंधित शिक्षकांवर कारवाई होईल, असे शिक्षण खात्याकडून सांगण्यात आले.
पदोन्नतीसाठी मिळविल्या बोगस पदव्या
By admin | Updated: May 23, 2016 02:20 IST