कल्याण : चिराग वाडकर हा अहमदनगर येथे राहणारा १२ वर्षांचा मुलगा. पतंग उडवताना त्याला विजेचा धक्का लागला. त्यामुळे त्याच्यावर हात गमावण्याची वेळ आली. तीन वर्षांपासून तो एका हाताने कामे करीत होता. शाळेने त्याला हात देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याला पुण्यातील नातेवाइकांनी कल्याण येथे शिबिरात पाठवले. त्याला कृत्रिम हालचाल करणारा ‘एलएन ४’ हा हात मिळाला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. चिरागप्रमाणे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचे काम रोटरी क्लब आॅफ कल्याण, जैन चॅरिटेबल ट्रस्टने रविवारी केले. निमित्त होते, ते ‘गिफ्ट आॅफ हॅण्ड’च्या वाटपाचे.कल्याण पश्चिमेतील महावीर सभागृहात रोटरी क्लब आॅफ कल्याण, जैन चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब आॅफ पुणे डाउन-टाउन यांच्यातर्फे हे शिबिर झाले. देशभरातून अनेक जण या शिबिरात आले होते. लहान मुलांपासून मोठ्यांना या शिबिरात कृत्रिम हात देण्यात आले. कोपरापासून खाली हात नसलेल्यांना ‘एलएन ४’, तर खांद्यापासून हात नसलेल्यांना माहीममधील डिस्ट्रिक्ट डिसअॅबिलिटी रिहॅबिलिटेशन सेंटरच्या माध्यमातून हात उपलब्ध करून देण्यात आला. ही संस्था उदयपूर येथून मापाप्रमाणे हात बनवून घेते. हात मिळाल्याने या अपंगांना आता स्वावलंबी होता येणार आहे. अपंगांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद हेच आमचे समाधान होते, असे आयोजकांनी सांगितले. चिराग वाडकर याने सांगितले की, हात गेल्याने मी निराश झालो होतो. माझी आई घरकाम करते. वडील घर सोडून निघून गेले आहेत. आईला मीच आधार आहे. मला शिकून मोठे व्हायचे आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘एलएन ४’ या कृत्रिम हातीच मदत होणार आहे. वाडकर यांच्याप्रमाणेच प्रकाश आम्रकोळी हे जळगावहून या शिबिरात सहभागी झाले होते. १५ वर्षांपूर्वी कारखान्यात काम करताना त्यांचा एक हात यंत्रात अडकला. त्यामुळे हात गमावण्याची वेळ आली. त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना एसएमएसद्वारे त्यांना कल्याणला कृत्रिम हात वाटपाच्या शिबिराची माहिती दिली. कृत्रिम हात मिळाल्याने बरीचशी कामे करता येणार असल्याचा विश्वास प्रकाश यांनी व्यक्त केला आहे.डोंबिवलीतील डीएनसी शाळेत शिकणारा प्रतीक कारंडे याच्या एका हाताला बोटे नाहीत. दुसरामनगटापासून हात नाही. त्याला बोटांसाठी सर्जरी करावी लागणार असली तरी त्याला कृत्रिम हात देण्यात आला. त्याच्या वडिलांनी समाधान व्यक्त केले. या कृत्रिम हातामुळे त्याला १५ ते २० टक्के फरक पडेल, असे त्याच्या पालकांनी सांगितले.या कार्यक्रमात ३५० जणांना कृत्रिम हातांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर २५० जणांनी हातासाठी नोंदणी केली. दरम्यान, हा जागतिक विक्रम ठरणार आहे, असा दावा आयोजकांनी केला आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, तामिळनाडू, जम्मू-काश्मीर या ठिकाणांहूनही हात घेण्यासाठी अपंग व्यक्ती आल्या होत्या. बाजारभावाप्रमाणे हात घेण्यासाठी ५० ते ६० हजार रुपये खर्च होता. संस्थेला ते अत्यंत अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लाभार्थ्यांना ते मोफत हात देण्यात आले. या कार्यक्रमास रोटेरियन दिलीप घाडगे, संजय पानसे, नगरसेवक सचिन खेमा, किशोर वैद्य, एस.पी. जैन, सुश्रुत वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.
...त्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद
By admin | Updated: November 14, 2016 04:02 IST