कल्याण : आई-वडिलांनी उपचारासाठी भोंदू बाबाच्या घरी ठेवलेल्या १५ वर्षांच्या मुलीचा सहा दिवसांनी खदानीत बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी बाबावर कारवाईची मागणी केली आहे. तर बाबाने अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचा आणि ती गर्भपातासाठी आल्याचा दावा केल्याने प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. मुलीच्या मृत्यूनंतर मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचल्याचा प्रत्यारोप त्याने केला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तिच्या मृत्यूचे गूढ उलगडेल, असे वासिंद पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या बाबाने जडीबुटीने आजपर्यंत किती मुलींचा गर्भपात केला आहे, याचाही तपास केला जाणार आहे. बदलापूरला राहणारे भारत सवर यांनी काही दिवसापूर्वी मुलगी दिपाली हिच्या पोटात गाठ असल्याने उपचारासाठी रवी हिम्बरे (रा. वासिंद) या बाबाच्या घरी नेले. तेव्हा त्याने तिला उपचारासाठी ठेवून घेतले. पालकांनीही त्यास होकार दिला. त्यानंतर पाच दिवसांनी मुलीचा नजीकच्या खदानीत कपडे धुताना तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. सवर कुटुंब अशिक्षित असल्याने सुरुवातीला त्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. मात्र काही दिवसांनी त्यांना बाबावर संशय आला. त्यामुळे त्यांनी वासिंद पोलीस ठाण्यात तक्रार केली. (प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीच्या मृत्युचा ‘बाबा’वर ठपका
By admin | Updated: June 12, 2016 01:05 IST