अनिकेत घमंडी, डोंबिवलीशिवसेना-भाजप वेगवेगळी लढत असतांना पक्षात तणातणी वाढू नये यासाठी बंडखोरांना शांत करतांना दोन्ही पक्षातील नेत्यांच्या तोंडाला फेस आला आहे. त्यातच तिकिट वाटप आणि मुलाखतीच्यावेळी एकत्र आलेले वरिष्ठ नेते बंडखोरांची समजूत काढतांना दिसत नसल्याने स्थानिक नेत्यांची कोंडी झाली होती. तरीही या दोन्ही पक्षांनी ठिकठिकाणच्या बंडखोरांना को. आॅप (स्वीकृत नगरसेवक) चे कॅडबरी आणि परिवहनचे लॉलीपॉप दाखविल्याचे सांगण्यात आले.पण असे किती को.आॅप घेता येतात, आणि किती सदस्य परिवहनवर जाऊ शकतात असा सवाल बंडखोरांनी विचारल्याने नेत्यांची फार पंचाईत झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरी कायम आहे. जेथे माघार घेण्यात आली त्या सर्वांना दोन दिवसांनी एकमेकांना सेम कमिटमेंट दिली असल्याचे समजल्याने हे लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यावेळी दाखविले. तसेच गाजर तर नाही ना? असा सवाल विचारला जात आहे. त्यामुळे जरी बंडाळी थोपवण्यात त्या पक्षांना यश आलेले असले तरी निकालांनंतर मात्र, पुन्हा कोंडी होणार असल्याचे स्पष्ट आहे. शिवसेनेच्या नेत्यांनीही असे आश्वासन दिल्याने नेमके किती जणांना त्या पदांवर घेणार असा सवाल आता विचारला जात आहे. >विधानसभा निवडणुकीत विशेषत: डोंबिवलीआणि कल्याण ग्रामीण, पूर्व-पश्चिम या मतदारसंघामध्ये त्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनाही विविध गाजरे दाखवण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र, त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही. काही काळ लोटल्यावर सारे काही अलबेल असल्याचा देखावा करण्यात आला. >डोंबिवलीसह कल्याणमधील अनेकांना दोन्ही पक्षांच्या वतीने आता उमेदवारी मागे घ्या, कुठेतरी अॅडजेस्ट करतो असे सांगण्यात आले. पण नेमके कुठे आणि कसे हे विचारण्याची हिंमत मात्र कोणीही दाखवलेली नाही, त्यामुळे ज्यांनी माघार घेतली त्यापैकी बहुतांशी सर्वच आपल्याला काही तरी मिळणार या भ्रमात असल्याने हास्यास्पद ठरले आहेत.<जे इच्छुक होते, ते प्रचाराला मोकळया मनाने येत आहेत की नाही हे माहिती नाही. ते विरुद्ध पार्टीला मदत करतील का? ही शंका सर्वांना आहे. प्रसिद्धी माध्यमांकडेही अनेकांनी त्यांचे मन मोकळे केले होते. त्यामुळे नाराज झालेले पक्षासोबत असले तरी प्रत्यक्ष प्रचारात किती असतील याबाबत मात्र शंका असल्याचे ठिकठिकाणच्या उमेदवारांनी सांगितले. < काही ठिकाणी तर पक्षातील वरिष्ठांमुळे काल पक्षात आलेल्याला तिकिट मिळतात, बघू कसे जिंकतात ते, असा प्रचार केल्यानेही काहींची पंचाईत झाली आहे. त्यामुळे नाराजांनी जरी तिकिट मागे घेतलेले असले तरी त्यांची नाराजी ठायी ठायी संबंधित उमेदवाराला भोवत आहे. नाराज झालेल्या व्यक्ती प्रचारापासून अलिप्त असल्या तरीही मतदार खोचक सवाल करत उमेदवाराच्या तोंडचे पाणी पळवतात. त्यामुळे बंडखोरी शमली की, केवळ उमेदवारी मागे घेतली असा सवाल उमेदवारांना पडला आहे.
सेनेसह भाजपची कोंडी..!
By admin | Updated: October 19, 2015 01:09 IST