लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी ) बँकेच्या उपाध्यक्षपदी भाजपाचे भाऊ लक्ष्मण कुऱ्हाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेच्या काही मिनिटे आधी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सर्व संचालकांसमोर कुऱ्हाडे यांची उमेदवारी घोषित केली असता त्यास कोणीही विरोध केला नाही. सर्वांच्या सहमतीने त्यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. आता बँकेवर बहुजन विकास आघाडी (बविआ) व भाजपाची संयुक्त सत्ता आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला या बँकेच्या सत्तेवरून पायउतार व्हावे लागले आहे. बँकेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया सहनिबंधक डॉ. अशोक कुंभार यांच्या नियंत्रणात पार पडली. कुऱ्हाडे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याविरोधात दिलेल्या वेळेत कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. यामुळे टीडीसीसी बँकेच्या उपाध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे डॉ. कुंभार यांनी घोषित केले. या वेळी सभागृहात बँकेचे सर्व संचालक व सीईओ भगीरथ भोईर उपस्थित होते. उपाध्यक्षपदी झालेली ही निवड एक वर्षासाठी आहे. भाजपा खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे आणि बविआचे सर्वेसर्वा माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कुऱ्हाडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. या उमेदवारीसाठी चार संचालकांनी अपेक्षा व्यक्त केल्याचे समजते. मात्र, सभागृहात सर्वांच्या समक्ष कुऱ्हाडे यांची उमेदवारी घोषित करून त्यांना विजयी घोषित केल्याचे बँक अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी लोकमतला सांगितले. एक महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे बँकेचे अध्यक्ष बाबाजी पाटील यांच्याविरोधात सर्व संचालकांनी अविश्वासाचा ठराव दाखल करून राष्ट्रवादीची सत्ता अल्पमतात आणली होती. बविआ आणि भाजपा संचालक एकत्र येऊन त्यांच्यात झालेल्या वाटाघाटीनुसार बँकेच्या अध्यक्षपदी या आधीच बविआचे राजेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड केली आहे. शुक्रवारी औपचारीकरीत्या निवडप्रक्रिया पूर्ण करून भाजपाचे कुऱ्हाडे यांना बँकेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी बहाल करण्यात आली. या वेळी मावळत्या उपाध्यक्षा बविआच्या सुनीता दिनकर यादेखील सभागृहात उपस्थित होत्या. त्यांनी दोन वर्षे या उपाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे. सध्या बँकेवर २१ संचालकांपैकी १९ संचालक आहेत. त्यात १७ संचालक सत्ताधारी बविआ व भाजपाचे आहेत.
भाजपाचे भाऊ कुऱ्हाडे जिल्हा बँक उपाध्यक्ष
By admin | Updated: May 13, 2017 00:50 IST