ठाणे : ‘दाढीवाला बुवा’ म्हणून आपल्याला हिणवणाऱ्यांनी प्रथम आपल्या पक्षात किती दाढीवाले आहेत, याची माहिती घ्यावी. तुमच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांना दाढी आहे. त्या दोघांचीच दहशत भाजपाच्या मंडळींवर नाही ना, असा सवाल ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. भाजपा नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यानेच त्यांच्याकडून बेताल वक्तव्ये केली जात असल्याचा टोला त्यांनी भाजपा शहराध्यक्ष संदीप लेले यांना लगावला.युती तुटल्यावर भाजपाने आयोजित केलेल्या मेळाव्यात भाजपाचे लेले यांनी, ‘दाढीवाल्या बुवा’ला आता घाबरण्याची गरज नसल्याचा टोला शिंदे यांचे नाव न घेता लगावला होता. त्याचा सोमवारी शिंदे यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. आमच्याकडे एकच दाढीवाला आहे, पण तुमच्याकडे तर मोदी, शहा यांच्यासह ठाण्यातील मंडळींनादेखील दाढी आहे. मग, तुम्ही काय मोदी-शहांच्या दहशतीखाली वावरता काय, असा सवाल त्यांनी केला. आम्ही दाढी वाढवली म्हणजे काय आम्ही लोकांना घाबरवत नाही. उलट, आमच्याकडे सर्वसामान्य नागरिक खुल्या मनाने केव्हाही आणि कुठेही येऊन भेटू शकतो. स्वर्गीय आनंद दिघे यांनादेखील दाढी होती, परंतु त्यांनी याच दाढीमुळे ठाणेकरांना सुरक्षिततेची हमी दिली होती. आम्ही सलग २५ वर्षे तेच करीत आहोत, असेही शिंदे म्हणाले. परंतु, आतापर्यंत जे जे दाढीवर बोलले, त्यांचे काय झाले, हे ठाणेकरांनी पाहिलेच आहे. त्यामुळे आता आमच्या मित्रपक्षाचीसुद्धा तीच गत होणार असल्याचा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी)
दाढीवाल्या मोदींचीच भाजपावर दहशत?
By admin | Updated: January 31, 2017 03:29 IST