कल्याण : पोलिसांकरवी राज्याचे गृहमंत्री शंभर कोटींची खंडणी वसूल केल्याच्या निषेधार्थ रविवारी कल्याण पूर्व भागात भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी भाजप कार्यकर्त्यांनी केली. लाज असेल तर सत्ता सोडावी अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली.
भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या विरोधात केलेल्या आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष संजय मोरे, पदाधिकारी सुभाष म्हस्के, नरेंद्र सूर्यवंशी, विजय उपाध्ये, प्रिया जाधव, पांडुरंग भोसले, संदीप तांबे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी भाजप आमदार गायकवाड यांनी सांगितले की, महाराष्ट्राला ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पोलिसांचा वापर करून राज्याचे गृहमंत्री शंभर कोटींची खंडणी वसूल करीत होते. राज्य सरकारने असे किती सचिन वाझे तयार केले आहेत. अशा सचिन वाझेच्याकरवी किती खंडणी वसूल केली जात आहे. वाझे याचा मुद्दा विधी मंडळात आला तेव्हा राज्य सरकारने वाझे याची साधी बदली करण्याचे मान्य केले नाही. खंडणीसाठी सत्ता सोडता येत नाही. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगून महाविकास आघाडी सरकारने सत्ता सोडावी.
-------------------------