ठाणे : युती तुटल्यावर शिवसेनेने आधीचा शब्द फिरवत उमेदवार उभा केल्याने आणि रामनाथ मोते यांनी केलेल्या बंडामुळे कोकण शिक्षक मतदारसंघावरील भाजपाची ३६ वर्षांची राजवट संपुष्टात आली आहे. शिक्षक परिषदेचे वेणुनाथ कडू, शिक्षक भारतीचे अशोक बेलसरे आणि बंडखोर उमेदवार रामनाथ मोते यांच्यात तीव्र चुरस असेल असे वाटत असताना शेकापचे बाळारम पाटील यांच्या विजयाने अनेकांना धक्का बसला आहे. ही जागा भाजपाच्या वाटणीची होती, पण युती तुटताच शब्द फिरवत शिवसेनेच्या शिक्षक सेनेने आव्हान दिले आणि ६८०० मते मिळवून भाजपा, शिक्षक भारती, रामनाथ मोते या साऱ्यांनाच मागे टाकत या मतदारसंघात आपले स्थान निर्माण केले. या मतदारसंघावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा प्रभाव असल्याचे मानले जात होते आणि त्यांचीच शैक्षणिक धोरणे प्रचारात लक्ष्य झाल्याने तो तावडे आणि भाजपा यांना मोठा धक्का आहे.शिक्षक परिषदेने उमेदवारी नाकारत ज्या पद्धतीने मावळते आमदार रामनाथ मोते यांना दूर केले, त्यांच्यावर कारवाईची भाषा केली, त्यामुळे त्यांनी केलेले बंड शिक्षक परिषदेला भोवल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले. बाळाराम पाटील यांना विधान परिषदेची जागा देण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसने दिले होते. ते त्यांनी पाळले. या निवडणुकीत शेकापची भिस्त रायगडमधील शैक्षणिक संस्थांवर सर्वाधिक होती. पण ज्यापद्धतीने गुरूजींच्या दारूपार्ट्या आणि मतांचा भाव यांची खुलेआम चर्चा होती, ते पाहता निवडणुकीचे निकाल धक्कादायक असतील असा अंदाज वर्तवला जात होता, तो खरा ठरला. (प्रतिनिधी)सत्ताधारी भाजपाच्या शिक्षण व शिक्षकांविरोधातील निर्णयामुळे संतापलेल्या शिक्षकांनी मला भरभरून मतदान केले. शिक्षक मतदारांच्या नोंदणीसाठी मी गेली दोन वर्षे परिश्रम घेतले. शिक्षण क्षेत्रातील चांगल्या व्यक्ती मिळाल्यामुळे कोकणच्या शिक्षकांचा आमदार होण्याचा सन्मान मला मिळाला.- बाळाराम पाटील, शेकापचे विजयी उमेदवार केवळ पैशाच्या जारोवर पाटील यांनी ही निवडणूक जिंकली. चुकीचा पायंडा पडला. मागील निवडणुकीत रायगडमध्ये केवळ सहा-साडेसहा हजार असलेले मतदान यंदा दहा हजारांवर गेले. मतदान केलेले खरच शिक्षकच होते की नाही. याचा शोध आम्ही लवकरच घेणार आहे. केवळ नोट देऊन शिक्षक वळविल्याने परिस्थिती गंभीर होणार आहे. - ज्ञानेश्वर म्हात्रे, शिक्षक सेनाया निवडणुकीत धनदांडग्याचा विजय झाला आहे. शिक्षक कार्यकर्त्यांचा पराभव झाला.- रामनाथ मोते, माजी आमदारहा लोकशाहीचा अंत आहे. शिक्षकापैकी कोणी विजयी झाले असते तर काही वाटले नसते. राजकीय व शैक्षणिक संस्थाचालक या मतदारसंघात शिरले आहेत. - वेणुनाथ कडू, शिक्षक परिषदशिक्षकांच्या समस्या सोडविण्यात आमचे आयुष्य गेले. चार महिन्यात आलेले जिंकत असतील तर शिक्षक चळवळ संपली आहे. - अशोक बेलसरे, शिक्षक भारती
भाजपाची ३६ वर्षांची राजवट अस्तंगत
By admin | Updated: February 8, 2017 04:13 IST