लोकमत न्यूज नेटवर्क अनगाव : संघ परिवाराचा विरोध डावलून भाजपाने भिवंडीतील २४ जागांवर कोणार्क आघाडीशी समझोता केल्याचे भरलेल्या अर्जांतून दिसून आले. भाजपाचे स्थानिक पातळीवर नवे आणि जुने गट असले, तरी पक्षाच्या उमेदवारीवर स्वाभाविकपणे कपिल पाटील गटाचा वरचष्मा दिसून येत आहे. शिवसेनेला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी भाजपाचे सर्वाधिक प्रयत्न सुरू असल्याचे उमेदवारीनंतर स्पष्ट झाले. भाजपाची कोंडी करण्यासाठी शिवसेनेला प्रसंगी इतर पक्ष मदत करू शकतात. त्याचे प्रत्यंतर मागील सत्ताकाळात आले होते. त्यामुळेच भाजपाने स्वत: ६० जागा लढवताना २४ जागांवर कोणार्क आघाडीशी समझोता केला आहे. अर्थात सर्व जागा एकाही पक्षाने लढवलेल्या नाहीत आणि भाजपाकडेही सर्व जागा लढवण्याइतके उमेदवार, कार्यकर्ते नसल्याने कोणार्कशी आघाडी करण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नव्हता. त्यामुळेच पक्षातील नाराजी वाढत असतानाही पक्षाने हा समझोता स्वीकारला.या पालिकेत सर्वात तगडे आव्हान देऊ शकणारा पक्ष काँग्रेस असला, तरी त्या पक्षाची संघटना विसविशीत झाल्याने स्वबळावर लढण्याचा त्या पक्षाचा निर्णय कितपत लाभदायक ठरतो, ते निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.भाजपात निष्ठावंत आणि नवभाजपावादी असे दोन गट उघडउघड दिसत असले, तरी पक्षाने सारी सूत्रे खासदार कपिल पाटील यांच्या हाती सोपवल्याने निष्ठावंतानी सुरूवातीला श्रेष्ठींच्या दरबारात गाऱ्हाणे घातले. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यातील काही जणांनी उमेदवारीसाठी स्थानिक नेतृत्वाशी जुळवून घेण्याचा पर्याय निवडला.शिवसेनेतील उमेदवारीबाबतही काही वाद होते. काहींनी बंडाचा निर्णय घेतला होता. पण जिल्ह्याचे एकहाती नेतृत्व करणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या क्षणी नाराजांची समजूत घालण्यात यश मिळवल्याने त्या पक्षातील बंड बऱ्यापैकी शमले. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीच्या शेवटच्या क्षणी ‘वरून’ झालेल्या आघाडीचा दोन्ही पक्षांना फायदा होईल, असे आता स्थानिक नेतेच सांगत आहेत. या स्थानिक नेत्यांचाच सुरूवातीला आघाडीला विरोध होता. पण आता मतविभाजन टळून दोन्ही पक्षांचा फायदा होईल, असा दावा त्या पक्षांचे नेते करीत आहेत.याचदरम्यान, भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंटच्या उमेदवारांनी पालिकेतील निवडणूक विभागाच्या मनमानीविरोधात राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांच्याकडे तक्रार केली आहे. अर्ज भरण्यासाठी गेलेल्या आमच्या उमेदवारांना निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बसवून ठेवले. पण नंतर त्यांचे अर्ज घेतले नाहीत, अशी त्यांची तक्रार आहे. त्यावर सहारिया यांनी ‘लक्ष घालतो’ असे आश्वासन या पक्षाच्या नेत्यांना दिले आहे.
भाजपा-कोणार्क एकत्रच
By admin | Updated: May 9, 2017 00:58 IST