- अनिकेत घमंडी, डोंबिवलीकल्याण-डोंबिवली महापालिकेत उपमहापौर पदासाठी शिवसेनेने उमेदवार उभा न करता भाजपाचे उमेदवार मोरेश्वर भोईर यांना साथ दिली. मात्र ही साथ देतानाच महापौर राजेंद्र देवळेकर यांनी लोकमतशी बोलताना भाजपाला टोले लगावले. शिवसेनेने युतीधर्म पाळला आहे. भाजपाला ठरल्याप्रमाणे हे पद कोणत्याही अटीविना दिले आहे. त्याची जाण ठेवून महापालिकेतील कामकाज यशस्वी होण्यासाठी आगामी काळात शिवसेनेला सहकार्य करावे, अशी अपेक्षाही देवळेकर यांनी व्यक्त केली.देवळेकर म्हणाले, की मुंबई महापालिकेप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीतही भाजपाने पारदर्शक पहारा देण्याचा निर्णय घेतला असता तर बरे झाले असते. पण ते आता सत्तेत आहेत. त्यांना बाहेर ढकलू तर शकत नाही. उपमहापौर पदासाठी आम्ही अडथळा न आणता साथ दिली आहे. राज्यातील युतीच्या सत्तेत भाजपाचा वाटा मोठा आहे. देशातही त्यांचीच सत्ता आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीच्या सर्वांगीण विकासासाठी निधी, विविध कारणांसाठी येथील राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घ्यायला हवा, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच भाजपाचे प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार, सहयोगी अपक्ष आमदार गणपत गायकवाड आदींनीही विकासासाठी एकत्र येत भरघोस निधी आणावा. त्यामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळेल.महापालिका हद्दीत सध्या पाणी समस्या, रस्ते, प्रदूषण आदी नागरी समस्या भेडसावत आहेत. त्या मार्गी लावण्यासाठी सगळ््यांनी एकत्र येऊन राज्यात दाद मागितल्यास निश्चितच तोडगा निघेल. गेल्या वर्ष-दीड वर्षात काय झाले ते नागरिकांना माहिती आहे, पण आता यापुढे तरी नागरिकांचे राहणीमान व शहरांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. यामध्ये शिवसेनेला साथ द्यावी. ती देता नाही आली तरीही आडकाठी करू नये. शिवसेना शब्द पाळते याचा पुनरुच्चारही देवळेकर यांनी केला. आता भाजपाने साथ द्यावी, अन्यथा... अशा शब्दांत देवळेकर यांनी अत्यंत सूचक शब्दांत भाजपाला टोला लगावला.महापालिका हद्दीतील विकास कामे व्हावीत, निधी मिळावा, यासाठी यासाठी शिवसेनेला निश्चितच सहकार्य करणार आहोत. ‘सबका साथ सबका विकास’ हे आमचे ब्रीदच आहे. त्यामुळे हद्दवाढीच्या निधीसंदर्भात स्थायी समितीचे सभापतीचे रमेश म्हात्रे यांना मी शब्द दिला. महापौरांनी अन्य प्रस्ताव माझ्याकडे आणावेत ते मार्गी लावण्यासाठी पुढाकार घईन. - नरेंद्र पवार, आमदार, कल्याण पश्चिम
भाजपाने पारदर्शक पहारा द्यायला हवा होता
By admin | Updated: March 12, 2017 02:45 IST