भिवंडी : महापालिका निवडणुकीत प्रथमच बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आपले नशीब आजमावणार असून शहरात याबाबत चाचपणी सुरू केली आहे.शहरातील राजकीय पक्षांचे नगरसेवक नागरिकांच्या विश्वासाला पात्र न ठरल्याने नवीन पर्याय म्हणून ही बहुजन विकास आघाडी नागरिकांसमोर जाणार आहे.मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यात अपयशी ठरलेले प्रशासन व नगरसेवक यांच्याविषयी नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्याचा फायदा घेत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार मतदारांसमोर जाणार आहेत. आघाडीचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष काशिनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष सज्जाद शेख यांनी दिली.महापालिकेने सिटीपार्कच्या जागी बेकायदा डम्पिंग ग्राउंड बनवून नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचवला आहे. हाच प्रमुख मुद्दा निवडणुकीचा असून हे डम्पिंग ग्राउंड प्रशासनाने सरकारने दिलेल्या जागेवर स्थलांतरित करावे, अशी मागणी केली जाणार आहे. रस्ते, पाणी व अस्वच्छता या विषयांबरोबर नागरिकांना व उद्योगास भेडसावणाऱ्या प्रश्नाबाबत आम्ही वाचा फोडणार आहोत,अशी माहिती शेख यांनी दिली. महापालिका क्षेत्रात प्रवासी वाहतुकीचा मोठा प्रश्न असून याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता नाही. राजकीय नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. वसई-विरार महापालिकेने शहरातून विरारपर्यंत सिटीबस सुरू केली होती. ही बस पोलीस नियंत्रण कक्षाजवळ उभी राहत होती. परंतु, शहरातील बेकायदा रिक्षाचालकांनी या सेवेस अडथळे निर्माण करून ती बंद पाडली. त्यामुळे वसई, बोरिवली व विरारकडे जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. त्याचप्रमाणे कल्याण-डोंबिवली व ठाणे महापालिकेची परिवहन सेवा शहरात आली पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे, असे शेख म्हणाले. प्रभाग क्रमांक-२ च्या परिसरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचे साधन नसल्याने मुलांच्या शिक्षणासह नोकरदारांना अर्थिक फटका बसत आहे. या परिसरात १५ वर्षांपासून नगरसेवक असलेले इम्रान खान विद्यमान स्थायी समितीचे सभापती आहेत. तरीदेखील त्यांनी या परिसराचा विकास न केल्याने या परिसरातील नागरिकांनी त्यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. त्यामुळे आठ दिवसांपासून या प्रभागात प्रस्थापित व विरोधक गटांमध्ये हाणामाऱ्या सुरू झाल्या आहेत, असा आरोपही शेख यांनी केला. हमीद शेख यांचे पॅनल डोईजड झाल्याने त्यांना मारण्याची धमकीही इम्राम खान यांनी दिल्याची तक्रार निजामपूर पोलीस ठाण्यात दाखल आहे. मात्र, पोलिसांनी कुणावरही अद्याप कारवाई केलेली नाही.(प्रतिनिधी)
बविआही उतरली रिंगणात
By admin | Updated: April 24, 2017 02:21 IST