लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : प्रेमीयुगुलांच्या चाळ्यांमुळे अगोदरच टीकेचे लक्ष्य झालेल्या उपवन परिसरात बाइक रायडर्सची धूम पुन्हा वाढली आहे. भररस्त्यावर जीवघेणे स्टंट करून स्वत:चा आणि लोकांचाही जीव धोक्यात घालणारे हे रायडर्स पोलिसांच्या नियंत्रणाअभावी निरंकुश झाले आहेत. त्यांच्यासाठी सीसीटीव्ही लावूनही फारसा फायदा झाला नसल्याचे दिसून आले असून अशा बेफाम वेगामुळे अपघात वाढू लागले आहेत.उपवन तलावाभोवती फिरण्यासाठी ट्रॅक बांधला आहे. त्याचा वापर रहिवाशांना फिरण्यासाठी कमी आणि प्रेमीयुगुलांनाच जास्त होतो. दिवस उजाडल्यापासून येथे प्रेमी युगुलांची गर्दी सुरू होते. त्यांचे अश्लील चाळे खुलेआम सुरू असल्याने येथील रहिवासी फेरफटका मारण्याचे टाळतात. प्रेमीयुगुलांची वर्दळ वाढल्याने येथे अवैध लॉजिंगचा व्यवसाय मध्यंतरी बोकाळला होता. काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई करून अवैध लॉज उद््ध्वस्त केले होते. त्यातून काही लॉजचे अनधिकृत धंदे बंद झाले असले, तरी प्रेमीयुगुलांची वर्दळ कमी झालेली नाही. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत या भागात प्रेमीयुगुलांचे जत्थे कायम असतात. तलाव परिसरात बॅडमिंटन खेळण्यासाठी लहानसे मैदान आहे. या मैदानाच्या पायऱ्यांचा आडोसा घेऊन रात्री या भागात ओल्या पार्ट्या रंगतात. यातूनच अनेकदा लहानसहान वादही होतात.पुन्हा उपवन भागात बाइक रायडर्सची धूम सुरू झाली आहे. रस्त्यांवर त्यांचे जीवघेणे स्टंट सुरू असतात. सुसाट वेगात कधी मागच्या चाकावर, तर कधी समोरच्या चाकावर बाइक चालवणे, एकाचवेळी पाचसहा जणांना बाइकवर उभे करून गाडी चालवणे, असे प्रकार येथे सर्रास होतात. त्यातून, ते स्वत:चा आणि लोकांचाही जीव धोक्यात घालतात. या भागातील रस्त्यांवर सीसी कॅमेऱ्यांची व्यवस्था आहे. त्यामुळे बाइक रायडर्सवर कारवाई करणे पोलिसांसाठी अवघड नाही. या कॅमेऱ्यांच्या फुटेजमधून पोलिसांना वाहनांचे नंबर आणि बाइक रायडर्सचा तपशील मिळू शकतो. पोलीस यंत्रणा उदासीन असल्याने हे प्रकार वाढतच आहेत. उपवन मनोहारी निसर्गरम्य परिसर आहे. येथे वर्दळही कमी असते. त्यामुळे अनेकदा मालिकांचे चित्रीकरण सुरू असते. रस्ते रुंद असल्यामुळे बाइक रायडर्सच्या स्टंटमुळे ध्वनिप्रदूषणही वाढते. येथील ल रहिवाशांनी याबाबत बऱ्याचदा आक्षेप नोंदवूनही उपयोग झालेला नाही. बहुतांश बाइक रायडर्स उच्चभ्रू कुटुंबातील असल्यामुळे पोलीस कारवाईस धजावत नसल्याचा आरोपही स्थानिक नागरिकांनी केला.भीषण अपघातात जोडपे जखमीबाइकवर जीवघेणा स्टंट करताना शनिवारी तरुण जोडपे याच भागात जखमी झाले. सुसाट वेगात बाइक चालवताना या तरुणाचे गतिरोधकाकडे लक्ष नव्हते. त्यामुळे बाइक उसळून दोघेही गंभीर जखमी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रेमसागर बैरागी यांना हा अपघात दिसला. त्यांनी थांबून लगेच जोडप्याला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आणि पोलिसांना माहिती दिली. लोकांच्या सुरक्षेसाठी या बाइक रायडर्सवर अंकुश लावण्याची मागणी बैरागी यांनी केली.
उपवन परिसरात बाइक रायडर्सची धूम
By admin | Updated: May 8, 2017 06:08 IST