लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मीरा - भाईंदर मनपाच्या कोविड केंद्रांची सकाळ आता भूपाळीने सुरू होणार आहे. या शिवाय जुनी सदाबहार गाणी कोरोना रुग्णांच्या प्रसन्नतेसाठी लावली जाणार आहे. रुग्णांसाठी समुपदेशन आणि योगासनांचे क्लासेसही सुरू केले जाणार आहेत. कोरोना रुग्णालयातील वातावरण प्रसन्न, प्रफुल्लित रहावे यासाठी हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह, मीनाताई ठाकरे सभागृह, प्रमोद महाजन सभागृह, समृद्धी कोविड केअर, न्यू गोल्डन नेस्ट अलगीकरण केंद्र व डेल्टा गार्डन येथे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तेथे मनपाच्या वतीने रुग्णांवर मोफत उपचार आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा तसेच जेवण, नास्ताही पालिका मोफत देत आहे. रुग्णांना वैद्यकीय आणि आहार आदी सर्व सुविधा पुरवतानाच त्यांची डॉक्टर, परिचारिका आदी कर्मचारी काळजी घेत असल्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका भेटीदरम्यान कौतुक केले होते. त्यावेळी शिंदे यांनी रुग्णालयातील वातावरण बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बसवलेल्या ध्वनी यंत्रणेमधून सर्व कोविड उपचार केंद्रांची सकाळची सुरुवात भूपाळीने होणार आहे. त्यानंतर लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, मुकेश, किशोरकुमार यांची जुन्या काळातील तसेच नव्या काळातील गायकांची गाणीही लावली जाणार आहेत.
सकारात्मक भावना निर्माण करणे हा उद्देशसर्व रुग्ण उपचारांना प्रतिसाद देतात; पण काही रुग्णांच्या मनात कोरोनाबाबत भीती निर्माण झालेली असते. शिवाय रुग्णांना अनेक दिवसरात्र रुग्णालयात उपचारासाठी रहावे लागत असल्याने संगीताच्या माध्यमातून त्यांची करमणूक होणार आहे. संगीतासारखे दुसरे औषध नसून वातावरण प्रसन्न रहावे आणि रुग्णांमध्येही सकारात्मक भावना निर्माण व्हावी यासाठी पालिकेचा हा प्रयत्न असल्याचे आयुक्त म्हणाले.